आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी मुलाखत:घोकंपट्टीवर आधारित परीक्षा पद्धती बदलली तरच घटेल विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे

औरंगाबाद / विद्या गावंडे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणताही नवा शिक्षणमंत्री नियुक्त झाला की तो दप्तराच्या ओझ्याबाबत काही नवीन उपाययोजना आणतो, मात्र एक तर त्याची अंमलबजावणी होत नाही किंवा ते उपायच प्रभावी नसतात. आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुस्तकातच वह्यांची कोरी पाने समाविष्ट करण्याचा नवा प्रस्ताव ठेवला आहे. बालभारतीने त्याबाबत शिक्षकांची मतेही मागवली आहेत. याबाबत ‘दिव्य मराठी’ने माजी शिक्षण संचालक आणि शिक्षण विकास मंचाचे संयोजक वसंत काळपांडे यांच्याकडे विचारणा केली असता ‘घोकंपट्टीवर आधारित परीक्षा पद्धती बदलत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार नाही,’ असे मत त्यांनी मांडले.

प्रश्न : पुस्तकातच वह्यांची पाने घातली तर दप्तराचे ओझे कमी होईल का? काळपांडे : दप्तराचे जे ओझे आहे तो फिजिकल लोड आहे. या निर्णयामुळे तो कमी होईल असे वाटत नाही. कारण जेवढी पुस्तकाची पाने तेवढीच वहीचीही ठेवावी लागतील. त्यामुळे पुस्तकाचे ओझे वाढेल. परिणामी दप्तरही जडच राहील.

प्रश्न : यापूर्वीही तीन विषयांचे एकच पुस्तक असा प्रस्ताव आला होता... काळपांडे : मराठी आणि उर्दू शाळांसाठी एकात्मिक द्विभाषिक पुस्तक केले आहे. पण पिसलेल्या पत्त्यासारखी काही पाने एकीकडे व काही दुसरीकडे असणे हे शैक्षणिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय योग्य नाही, सरकारने ते थांबवावे. नवीन शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रम बदलेल. त्यानुसार योजना बनवणे आवश्यक आहे. प्रश्न : योजनांची नुसतीच चर्चा होते. पण अंमलबजावणीचे काय? काळपांडे : सरकारी शाळांमध्ये दप्तराचे ओझे फार नसते, खासगी शाळांमध्येच हा प्रकार जास्त दिसतो. त्यांनी भरपूर पुस्तके अनिवार्य केलीत. पालकांनाही ते प्रतिष्ठेचे वाटते. पण रोजच सर्व पुस्तके शाळेत आणायला सांगणे योग्य नाही. त्यामुळे दोष खासगी शाळांमध्ये आहे. यात पालकांची मनोभूमिका बदलणे आवश्यक आहे.

प्रश्न : दप्तराचे ओझे हा खरंच मोठा प्रश्न आहे का? काळपांडे : मुले अभ्यासाशिवाय खेळ, खाऊ व इतर अनेक गाेष्टी सोबत नेतात म्हणूनही ओझे वाढते. पाठीवरच ओझ्यापेक्षा मेंदूवरचे ओझे कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी पुस्तक हातात न घेता शिकवले पाहिजे. शाळेत पुस्तके आणायला सांगणे चुकीचेच. प्रश्न : ऑनलाइन पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून दिली तर ? काळपांडे : ते योग्य नाही. शहरात प्रत्येकाच्या घरी सोय आहे म्हणून सर्वत्र आहे असे नाही. तसेच पाठ्यपुस्तके वाचण्याचा जो फील आहे तो ऑनलाइनमध्ये येणार नाही. छापील साहित्य हाताळण्याची सवय मुलांना या वयातच व्हायला हवी. प्रश्न : पुस्तक व वह्या खरेदीत मोठी उलाढाल होत असते. शाळाही त्यात सहभागी असतात. मग पुस्तकातच वहीचा निर्णय कसा यशस्वी होईल? काळपांडे : मुळात हा निर्णयच योग्य नाही, मग तो यशस्वी व्हायला कशाला हवा?

बातम्या आणखी आहेत...