आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवासाठी बैठक:आमदार, खासदार, मंत्र्यांनीच वाचला खड्डे-रस्ते समस्यांचा पाढा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी संत एकनाथ रंगमंदिरात समन्वय समितीची बैठक झाली. आजयर्पंत अशा बैठकांना ‘शांतता समिती’ असे नाव असायचे, यंदा बदल करून ‘समन्वय’ असा उल्लेख करण्यात आला, मात्र अडीच तासांचा खल झाल्यानंतरही लोकप्रतिनिधीत निर्विघ्न उत्सव साजरा करण्यासाठी कोणताही ‘समन्वय’ दिसला नाही. उलट २० वर्षांपेक्षा अधिक काळ वेगवेगळ्या पदावर राहिलेल्या नेत्यांनीच समस्यांवर बोट ठेवत प्रशासनावरच ताशेरे ओढण्यात धन्यता मानली. त्यामुळे अपेक्षा घेऊन आलेले मंडळ पदाधिकारी चकित झाले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इत्मियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा प्रशासक अभिजित चौधरी, माजी खासदार चंद्रकांत खैरे, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय औताडे, किशनचंद तनवाणी यांची उपस्थिती होती.

खड्डे : सुरुवातीला खड्डे बुजवण्याची विनंती मंडळांनी केली. त्यावर खैरेंनी ‘मनपाने नक्कीच खड्डे बुजवतील,’ असा टोला लगावला. आमदार संजय शिरसाट यांनी मात्र मनपावर सडकून टीका केली. ‘अधिकारी समस्या लिहून घेताय, पण उत्सवात रस्त्यावर ते दिसत नाहीत. रोपळेकर- जवाहरनगर रस्त्यावर सर्वाधिक खड्डे. आता त्याचे भूमिपूजन झाले. पण ठेकेदार कधी काम सुरू करेल त्यालाच माहिती. खासदार इम्तियाज म्हणाले, ‘आता सहा मंत्रिपदे मिळालीत. त्यामुळे आता खड्ड्यांचे हे शेवटचे वर्ष असेल,’ असा टाेमणा मारला. मंत्री सावेंनी उत्सव आला की मनपाला खड्डे आठवतात. आता शेवटच्या तीन दिवसांत खड्डे बुजवतील. पण खड्डे बुजवणे म्हणजे माती टाकणे नव्हे,’ असा टोला लगावला. घोडले यांनीही खूप त्रास होतोय, खड्डे आधी बुजवा, असे सांगितले.

मानापमान नाट्य : खैरेंचा सत्कार शिरसाट यांच्या जिव्हारी
शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. काही वेळ हास्यविनोद झाले. पण सूत्रसंचालक पोलिस अधिकाऱ्याने सुरुवातीला येऊन बसलेले खैरे यांचे नाव सत्कारासाठी सर्वात आधी घेतले. त्यामुळे चिडून आमदार शिरसाट ताडकन उभे राहिले. ‘प्रोटोकॉल आहे की नाही?’ असे म्हणत ते निघून जाऊ लागले. पण इम्तियाज यांनी शांत करून त्यांना खाली बसवले. पोलिस आयुक्तांनीही शिरसाटांना शांत राहण्याची विनंती केली.

आकाशवाणी, अमरप्रीत चौक अमरप्रीत, आकाशवाणी चौकातील बॅरिकेड्स काढा, अशी मागणी मंडळांनी केली. त्यावर शिरसाट म्हणाले, ‘एका व्यक्तीच्या हटवादी भूमिकेमुळे अनेकांना हा त्रास होतोय. दूरवर वळसा घालून जावे लागतेय.मंत्री सावेंनी मलाही इतरांप्रमाणेच वळसा घालून जावे लागतेय, असे सांगत टीका केली.पाेलिस आयुक्त गुप्ता यांनी मात्र टीकाकारांना उत्तर दिले. ते म्हणाले, चौक बंद करण्यात मला रस नाही. नागरिकांचीच मागणी होती. रस्त्यांवरची वाहतूक, दोन चौकातील वाहन संख्या पाहून निर्णय घेतला. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्हीही अभ्यास करा. ज्यांना अडचण आहे त्यांना माझ्याकडे घेऊन या. आपण चर्चा करू.’ त्यावर शिरसाट यांनी पहिले किमान एक तरी बॅरिकेड्स उघडा, दुसऱ्याचं नंतर पाहू, अशी टिप्पणी केली.

शिवाजीनगर रेल्वे गेटचा प्रश्न रोज हजारो नागरिकांसाठी मनस्ताप ठरलेला शिवाजीनगर गेटचा प्रश्न कधीतरी निकाली काढा हो,’ अशी मागणी मंडळांकडून झाली.खासदार इम्तियाज म्हणाले, ‘महापालिका आयुक्त, तुम्ही नवी आहात. गणेशोत्सवाची भेट म्हणून तरी येत्या वर्षभरात रेल्वेगेटचा विषय मार्गी लागेल, असे आश्वासन तुम्ही द्या. डॉ. कराड साहेब, बँका तुमच्या, तिजोरीचे प्रमुख तुम्ही. रेल्वेमंत्री तुमचे, तर तुम्हीही पुढाकार घ्या, पण मार्गी लावा.’मंत्री सावे यांनी ‘आमचे मंत्री तर करतीलच. इम्तियाजजी, तुम्हीही खासदार आहात. जोर लावा,’ असा प्रतिसल्ला दिला. त्यावर इम्तियाज यांनी तत्काळ ‘तुम्ही आता मला मंत्री करा, मी सगळे कामे करतो,’ असे सांगून अतुल सावेंना गप्प केले.

बातम्या आणखी आहेत...