आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावंचित बहुजन आघाडीच्या वतीने १ मे रोजी शांतता मार्च काढण्याचे नियोजन केले होते, पण पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली. त्याउलट प्रक्षोभक भाषण करून दंगली घडवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. प्रक्षोभक भाषण करणाऱ्या राज ठाकरेंवर ‘यूएपीए’अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारूक अहमद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे, सतीश गायकवाड, जलीस अहमद, अफसर पठाण, भगवान खिल्लारे आदींची उपस्थित होती. फारूख अहेमद म्हणाले की, देशात व राज्यामध्ये जातीय दंगली घडवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांच्या मदतीने दंगली पेटविण्यात आल्या. महाराष्ट्र हे शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे राज्य आहे. त्यामुळे राज्यात दंगली होणार नाहीत याची खात्री होती. पण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष राजकीय स्वार्थासाठी राज्यामध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे प्रक्षोभक भाषण करून चिथावणी देत आहेत.
एक मे रोजी आम्हाला शांतता मार्च काढायचा हाेता, पण पाेलिसांनी परवानगी दिली नाही. शांतता मार्चची वेळ सकाळी ठेवावी, असे पोलिस आयुक्तांनी सुचविले परंतु राज्यभरातील मार्चची वेळ सायंकाळी असल्याने ते बदलणे शक्य नव्हते. राज ठाकरेंच्या सभेच्या दिवशी पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना डांबून ठेवले. कार्यकर्त्यांनी सभा उधळण्याची धमकी दिली नव्हती मग हा अन्याय कशासाठी, असा प्रश्न फारुख यांनी विचारला. हिजाब गर्ल बेबी मुस्कानच्या सत्काराला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मग राज ठाकरेंच्या सभेला परवानगी का दिली, असा प्रश्न उपस्थित करत पोलिस आयुक्त निखिल गुप्ता राजकीय दबावाखाली काम करीत आहेत, असा आरोपही फारुख यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.