आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कन्नड तालुक्यातील परीक्षा केंद्रच हरवले आहे. कोळवाडी गावातील स्वर्गीय गोविंदराव जिवरख कला, वाणिज्य अाणि विज्ञान महाविद्यालय असे त्या केंद्राचे नाव आहे. विद्यापीठाचे भरारी पथक ३१ मार्चला तिथे गेले तर एका छोट्या खोलीला कॉलेजचा बोर्ड दिसला. परीक्षा मात्र अतिशय गुप्तपणे २२ किमी अंतरावरील औराळा गावाच्या शाळेत घेतली जात असल्याचे गावकऱ्यांनी पथकाला सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे विद्यापीठाला कळू नये म्हणून कोळवाडीत प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून औराळ्याला व्हाॅट्सअॅप केली जाते.
तीन प्राध्यापकांचे भरारी पथक शुक्रवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान कोळवाडीत पोहोचले. एक हजार लोकसंख्येच्या या गावात माध्यमिक शाळाही नाही. पण शासनाच्या दबावात विद्यापीठाने कॉलेज दिले आहे. राधा-गोविंदा शिक्षण प्रसारक मंडळाचे जिवरख कॉलेज आहे. विद्यापीठाने मागील वर्षी कॉलेज नाकारले असताना तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या आग्रहामुळे कॉलेज दिले. शुक्रवारी बीए, बीकॉम, बीएस्सीच्या ९७ विद्यार्थ्यांची परीक्षा होती. भरारी पथकाला परीक्षा केंद्रच सापडले नाही. गावात फक्त पाटी आहे, पण कॉलेज नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
संस्थेचे प्रमुख विजय जिवरख यांना गावकऱ्यांनी भरारी पथक आल्याचे फोन करून सांगितले. इकडे पथकाला पाठवू नका, असे ते म्हणाले. त्यामुळे २२ किमी अंतर कापून पथक औराळ्यात पोहोचले. शाळेत परीक्षा सुरू असल्याचे त्यांना दिसले. शिवाय एका बेंचवर समान विषयांच्या ३ परीक्षार्थींना बसवल्याचेही आढळले. जाब विचारला तर जिवरख यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने लेखी अहवाल परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांना पाठवला, पण त्यांनीही काहीच दखल घेतली नाही.
आम्ही नवीन आहोत, चुका होतात : जिवरख प्रश्न : कोळवाडीत परीक्षा केंद्र सापडत नाही..? उत्तर : तेथेच परीक्षा सुरू आहेत. प्रश्न : भरारी पथकाला तर दिसलेच नाही, तुम्ही परीक्षा औराळ्यात घेताय..? उत्तर : सर, थोडं समजून घ्या. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. प्रश्न : क्षमता नव्हती तर कॉलेज काढले कशाला..? उत्तर : सर, मी तुम्हाला येऊन भेटतो. बातमी नका प्रसिद्ध करू प्रश्न : तुम्ही चक्क कोळवाडीला प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून औराळ्याला व्हाॅट्सअॅपवर पाठवता..? उत्तर : सर, मी तुम्हाला येऊन भेटतो, थोडं सहकार्य करा. प्रश्न : सोशल मीडियावर पेपर टाकता, पेपर लीक झाला तर कोण जबाबदार असेल..? उत्तर : सर, कोळवाडीची जागा भाड्याने घेतली आहे, तिथे काम सुरू आहे. मदत करा.
त्या कॉलेजची संलग्नताही काढून घेऊ भरारी पथकाने जर अहवाल पाठवला असेल तर तो माझ्यापर्यंत आला नाही. मी शनिवारी सायंकाळी परीक्षेचा आढावा घेतला होता. त्या वेळी हा मुद्दा चर्चेला आला नव्हता. पण असे असेल तर मी फक्त परीक्षा केंद्र रद्द करणार नाही,त्या कॉलेजची संलग्नताही काढून घेईन. -डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.