आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सिडकोत २९ कर्मचाऱ्यांपैकी तिघेच वेळेत हजर

संतोष उगले | वाळूज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको कार्यालय वाळूज महानगर-१ येथे गुरुवारी (८ डिसेंबर) सकाळी ९.४५ वाजता सिडकोचे प्रशासक सोहम वायाळ यांनी स्थापत्य व अभियांत्रिकी कार्यालयास भेट दिली. त्या वेळी २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी फक्त तिघेच उपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आहे. वायाळ यांनी नंतर वेळेत उपस्थित न राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी घेत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

सिडको वाळूज महानगर-१ येथील अधिकारी व कर्मचारी वेळेत कामावर येत नाहीत, दुपारची जेवणाची सुटी झाल्यानंतरही ते वेळेत परत येत नाहीत, वेळेआधीच घरी निघून जातात, नागरिकांची कामे वेळेत करत नाहीत आदी तक्रारी येथील नागरिकांनी सिडकोच्या प्रशासनाकडे केल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेत सिडकोचे प्रशासक सोहम वायाळ यांनी सकाळी वाळूज कार्यालयातील स्थापत्य व अभियांत्रिकी या दोन्ही विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा दोन्ही कार्यालयातील ६ अधिकारी, ५ कर्मचारी आणि १८ सुरक्षा रक्षक यांच्यापैकी फक्त दोन शिपाई आणि एक सुरक्षा रक्षक वेळेत उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले.

काही अधिकारी तर तब्बल दोन तास आले उशिरा
सिडको अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन कामकाज सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत चालते. त्यांनी सकाळी साडेनऊ वाजता येणे बंधनकारक असताना काही जण १०.३५ वाजता तर काही अधिकारी थेट ११.१६ वाजता उपस्थित झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आले. सिडकोच्या मालमत्ता आधिकारी अस्मिता बोर्डे यांच्यासह उशिरा आलेल्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती वायाळ यांनी दिली.

सुरक्षा रक्षकांचे ‘प्रयत्न’, अधिकाऱ्यांची धावपळ
अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना एक ते सव्वा तास उशिरा येण्याची सवय आहे. वायाळ अचानक कार्यालयात आले आहेत अशी माहिती एका सुरक्षा रक्षकाने त्यांना दिली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी धावत-पळत कार्यालय जवळ केले.

बातम्या आणखी आहेत...