आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाला प्रस्ताव:होमिओपॅथिक डॉक्टरांना संधी ; कोविड सेंटरवर नियुक्तीसाठी शासनाला प्रस्ताव !

बीड(अमोल मुळे)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मात्र प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा दोन जागा असल्याने याचा फारसा लाभ होत नाही

वाढती रुग्णसंख्या आणि आरोग्य विभागात डॉक्टरांचे कमी मनुष्यबळ यावर तोडगा काढण्यासाठी कोविड केअर सेंटरवर आता होमिओपॅथिक डॉक्टरांनाही वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. बीड जिल्हा परिषदेने होमिओपॅथिक डॉक्टरांना नियुक्ती देण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव आराेेग्य संचालकांकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास राज्यभरात अंमलबजावणी होऊ शकते. लाखो होमिओपॅथिक डॉक्टरांचे शासनाच्या सेवेत येण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.

आयुर्वेदिक डॉक्टरांप्रमाणे होमिओपॅथिक डॉक्टरांनाही शासनाच्या सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती द्यावी, अशी होमिओपॅथिक डॉक्टरांची वर्षानुवर्षांची मागणी आहे. यासाठी त्यांनी अनेक माेर्चे काढले, आंदोलने केली. सध्या आयुष विभागामार्फत होमिओपॅथिक डॉक्टरांच्या जागा भरल्या जातात. मात्र प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा दोन जागा असल्याने याचा फारसा लाभ होत नाही. दरम्यान, बीड जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग वाढत असून रुग्णसंख्या ६५ हजारांवर गेली आहे. एक हजारावर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांवर उपचार करताना यंत्रणेची दमछाक होत आहे. विशेषज्ञांची कमतरता आहेच, शिवाय नियमित डॉक्टरांसह एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस डॉक्टरांची कंत्राटी भरती करूनही उपचारांसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. जिल्ह्यात ४ कोविड हॉस्पिटल, ७ कोविड हेल्थ सेंटर आणि ६१ कोविड केअर सेंटर आहेत. यावर सेवा देण्यासाठी अर्ज मागवले गेले होते. मात्र आता एमबीबीएस आणि बीएएमएस उमेदवारही मिळेनासे झाले आहेत.

मनुष्यबळाच्या या अडचणीवर मात करण्यासाठी कोविड केअर सेंटरवर आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून बीएएमएसबरोबरच होमिओपॅथिक डॉक्टरांनाही सेवा देण्यासाठी मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आरोग्य संचालक तथा राष्ट्रीय आरोेग्य अभियान संचालकांना पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर राज्यासाठी हा निर्णय होऊ शकतो. राज्यातील लाखो होमिओपॅथिक डॉक्टरांना याचा फायदा होऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...