आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखीव उमेदवारांना आर्थिक भुर्दंड:बीएडसाठी ऑप्शन फॉर्म भरणे सुरू, कास्ट व्हॅलिडिटी नसल्यास 200 रुपये शुल्क

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीएड प्रवेश प्रक्रियेत उमेदवारांना राउंडसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. करण उमेदवारांना १० नोव्हेंबरपर्यंत ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत दिली आहे. वारंवार मुदतवाढ दिल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. परंतु, राखीव गटातील ज्या उमेदवारांनी कास्ट व्हॅलिडिटीचे प्रमाणपत्र अपलाेड केले आहेत. त्यांची आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण होत आहे. मात्र, आरक्षित जागेसाठी कास्ट व्हॅलिडिटीचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास राखीव उमेदवारांकडून अतिरिक्त २०० रुपये शुल्क आकारून त्यांना खुल्या वर्गात ग्राह्य धरले जात आहे. त्यामुळे आरक्षित जागेवरील एससी, एसटी, व्हीजेएनटी, आेबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दरम्यान, परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट न देणाऱ्या ४४ बीएड कॉलेजांना प्रवेश देताच येणार नाही या आशयाखाली दिव्य मराठीने ५ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित करताच ६ नोव्हेंबरपासून ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत ९ हजार ६८४ जणांनी फॉर्म भरले आहेत.

यंदा बीएड अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी ऑगस्टमध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली. परंतु, महाविद्यालयांनी प्रवेश क्षमता यादी निश्चित केली नसल्याने तीन महिन्यांनी ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वेळापत्रक जाहीर करूनही महाविद्यालयांनी ते पाळले नाही. यामुळे प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. सीईटी सेलच्या वतीने आरक्षित जागेवरील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावा लागत आहे. आरक्षित जागांवरील उपयोग घेता येत नसेल तर त्याचा काय फायदा, असा सवाल राखीव उमेदवारांनी उपस्थित केला आहे. पूर्व परीक्षेसाठी खुल्या वर्गाला ८००, तर राखीव उमेदवारांकडून ६०० रुपये शुल्क आकारण्यात आले. मात्र, आता कास्ट व्हॅलिडिटी नसल्यास राखीव उमेदवारांनाही खुल्या वर्गातून २०० रुपये अतिरिक्त शुल्क भरून अर्ज करावे लागत असल्याचे एका महाविद्यालयातील प्राचार्यांनी सांगितले.

बीएड प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांची इतर अभ्यासक्रमांकडे धाव बीएड प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू होत आहे. बीएड अभ्यासक्रमासाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सत्राचे वेळापत्रक लांबणीवर पडणार आहे. कोविडमुळे दोन वर्षे सत्र लांबणीवर पडले होते. यंदाही प्रशासकीय पातळीवरून विलंब झाल्याने शैक्षणिक सत्र बिघडले आहे. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली असून विद्यापीठांना परीक्षांचे नियेाजनही स्वतंत्रपणे करावे लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे.

औरंगाबाद जिल्ह्ात ४८ बीएड महाविद्यालय, प्रवेश क्षमता अडीच हजारांहून अधिक राज्यभरातून ५६ हजार ४३२ उमेदवारांनी बीएडसाठी नोंदणी केली आहे. एकूण कॉलेजची संख्या ४१४ आहे. यात ५२ हजार ९७५ जणांनी अॅप्लिकेशन लॉक केले आहे. त्यापैकी ४७ हजार ६३३ अर्जांची पडताळणी झाली असून रविवारी सायंकाळपर्यंत ९ हजार ६८४ उमेदवारांनी ऑप्शन फॉर्म भरल्याची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मात्र, किती प्रवेश क्षमता आहे याची स्पष्टता नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ४८ बीएड कॉलेज असून त्यांची प्रवेश क्षमता ही अडीच हजारांहून अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...