आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान विभागाचा अंदाज:मराठवाड्यासह विदर्भातमुसळधार पावसाचा इशारा, औरंगाबाद, जालना, बीडसह 15 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची आ‌वश्यकता

हिमालयाच्या पायथ्याशी सरकलेला मान्सूनचा आस आता नेहमीच्या जागी अर्थात पश्चिम राजस्थान, मध्य भारतात आला आहे. तसेच बंगालच्या उपसागारात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यास अनुकूल स्थिती आहे. परिणामी राज्यासह दक्षिण व मध्य भारतात ५ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढू शकतो. राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात कमी दाबाचा पट्टा असलेला मान्सूनचा आस उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याशी गेल्याने पावसाने दडी मारली होती. शेवटच्या आठड्यापासून मध्य व दक्षिण भारतात मान्सून पुन्हा सक्रिय झाला. आता मान्सूनचा आस त्याच्या नेहमीच्या जागी आला आहे. परिणामी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही हवामान विभागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची आ‌वश्यकता : यंदा जूनपासूनच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे व नाशिक या जिल्ह्यांसह विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहिले. मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात त्या तुलनेत पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरी ऑगस्टमध्ये पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने चिंतेत भर पडली आहे. आता सर्वच विभागात जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

५ ते ८ सप्टेंबर : राज्यात जोरदार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनुसार, ५ ते ८ सप्टेंबरदरम्यान राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल. १५ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट औरंगाबाद, जालना, परभणी,नांदेड, हिंगोली, लातूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा व कोकणातील जिल्हे येथे या काळात ६४.५ ते २०४.४ मिमी पावसाची शक्यता.

यलो अलर्ट जळगाव, बीड, उस्मानाबाद, नगर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांतील बऱ्याच ठिकाणी ६४.५ ते ११५.५ मिमी पावसाची शक्यता.

ग्रीन अलर्ट धुळे, नंदुरबार, सांगली, सोलापूर, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत १५.५ ते ६४.४ मिमीपर्यंत पावसाची शक्यता

५ जिल्ह्यांत पावसाची तूट राज्यातील नंदूरबार, अमरावती, बुलडाणा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांत अद्यापही पावसाची मोठी तूट आहे. सर्वाधिक ४३% तूट नंदूरबार जिल्ह्यात असून अमरावती (२६ % ), बुलडाणा (२० % ), गडचिरोली (२५ % ) आणि गोंदिया (२७% ) असे तुटीचे प्रमाण आहे.

बातम्या आणखी आहेत...