आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली जिल्हयात टोळीने गुन्हे करणाऱ्या ११ जणांना पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी चांगलाच दणका दिला असून त्यांना दोन वर्षासाठी हिंगोली जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी ता. ३१ काढण्यात आले आहे. त्यामुळे टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर वचक बसणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात विशेषतः वसमत तालुक्यात मागील काही दिवसांत टोळीने गुन्हे केले जात होते. टोळक्यांकडून मारहाण, दरोडा या सोबतच इतर गुन्हे देखील दाखल होते. वसमत व हट्टा पोलिस ठाण्यात ११ जणांवर मोठ्या संख्येने गुन्हे असल्यामुळे त्यांच्या विरुध्द कडक कारवाई करण्याचा निर्णय पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी घेतला होता. त्यानुसार टोळीने गुन्हे करणाऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याच्या सुचना त्यांनी वसमत व हट्टा पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस ठाण्यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे सविस्तर अहवाल सादर केला होता.
या अहवालावरून या टोळक्यांकडून गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याबाबतची माहितीही गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार विलास सोनवणे यांच्या पथकाने सादर केली होती. पोलिस ठाण्याचे अहवाल व गुन्हे शाखेच्या माहितीवरून टोळी प्रमुख भुऱ्यासिंग चतुरसिंग चव्हाण, हिरासिंग भुऱ्यासिंग चव्हाण, साहेबसिंग उर्फ बंगालसिंग रतनसिंग चव्हाण, बाळू उर्फ अभिजीत उर्फ अविनाश कैलास खंदारे (सर्व रा. वसमत) यांच्या सह दोन महिलांचा समावेश आहे.
या शिवाय महेंद्र भगवान करवंदे, सुनील गंगाधर करवंदे, धम्मपाल संभाजी करवंदे (सर्व रा. मुडी ता. वसमत), पंडीत बापुराव गायकवाड, रमेश सुरेश गायकवाड (रा. गणेशपूर ता. वसमत) या ११ जणांना हिंगोली जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी काढले आहेत. या सर्वांना हिंगोली जिल्हयाच्या हद्दीतून तातडीने बाहेर काढून देण्याचे आदेश वसमत व हट्टा पोलिसांना दिले आहेत. पोलिस अधिक्षकांच्या या आदेशामुळे टोळक्याने गुन्हे करणाऱ्यांवर वचक बसणार असल्याचे बोलले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.