आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा७३ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेच्या आयोजनाचा मान यंदा औरंगाबाद शहराला मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित या परिषदेत ‘भारतीय अर्थव्यवस्थेची पाच ट्रिलियन डॉलरकडे वाटचाल’ या विषयावर मंथन केले जाईल. विशेष म्हणजे, देशपातळीवरील या परिषदेचा मान औरंगाबादला २४ वर्षांनी मिळाला आहे. २२ ते २४ डिसेंबरदरम्यान होत असलेल्या परिषदेच्या उद्घाटनासाठी विद्यापीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले आहे.
भारताला जी-२० चे यजमानपद मिळाले आहे. त्यामुळे राज्याच्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतही जी-२० चे खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जी-२० पूर्वीच म्हणजेच २२ ते २४ डिसेंबरदरम्यान औरंगाबादेत महावाणिज्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतातील विविध विद्यापीठे, महाविद्यालये आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधून वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, उद्योगपती, कुलगुरू परिषदेत सहभागी होतील. परिषदेचे हे ७३ वे अधिवेशन आहे. २४ वर्षांपूर्वी अशी परिषद शहरात आयोजित केली गेली होती. आता दुसऱ्यांदा ही परिषद शहरात होत आहे. परिसंवादात ७ विषयांवर चर्चा केली जाणार आहे. सहा महिन्यांपासून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात परिषदेची तयारी सुरू आहे. ‘फाइव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ अशी परिषदेची थीम आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले आहे. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, विभागप्रमुख तथा समन्वयक डॉ. सय्यद अझरुद्दीन यांच्यासह प्राध्यापकांच्या विविध समित्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. ऑल इंडिया कॉमर्स कॉन्फरन्सच्या विद्यमान अध्यक्ष तथा भुवनेश्वर येथील किट युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू प्रा. डॉ. सस्मिता सामंथा, केरळ येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एच व्यंकटेशरलू, प्रा. मानस पांडे, प्रा. नरेंद्र कुमार, प्रा. पुष्पेंद्र मिश्रा, प्रा. नवल किशोर आदी वक्ते निरनिराळ्या सत्रांत मार्गदर्शन करतील.
यंदाची परिषद ऐतिहासिक क्षण ठरेल या परिषदेनंतर पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदही होत आहे. विकसनशील देशांत भारताची सर्वाधिक गतीने वाटचाल सुरू आहे. यंदाची परिषद ऐतिहासिक व विकासासाठी आशादायक ठरेल. - डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू
दोन हजार प्राध्यापक, उद्योजक येतील दोन हजार प्रतिनिधी येतील. रोजगार निर्मिती डिजिटल ब्रँडिंग, मानव संसाधन विकास रणनीती, सर्वसमावेशक विकास, मार्केटिंग व आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयांवर तज्ज्ञांची भाषणे होतील. - डॉ. वाल्मीक सरवदे, सदस्य सचिव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.