आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा:औरंगाबादेत 8 ऑक्टोबरपासून आयोजन;100 खेळाडूंचा असेल सहभाग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी.आर.एस. फाऊंडेशन, औरंगाबादच्या वतीने राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे औरंगाबादेत आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 08 ते 12 ऑक्टोबरदरम्यान चित्रकूट व्हॅली येथील चेस लँड, कांचनवाडी जवळ पाटोदा गाव येथे खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेची मान्यतेने होईल, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

विशेष म्हणजे या स्पर्धेतून युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग मिळवण्याची संधी मिळणार आहे. याप्रसंगी टीआरएसच्या अंजली सागर, सचिव तेजस्विनी सागर, पंच अजय पटेल, प्रशिक्षक विकास बलांडे, मुकेश पाटील, पंच विलास राजपूत, मिथुन वाघमारे, सुदाम झोटिंग यांची उपस्थिती होती.

महिला बुद्धिबळला चालना देण्याचा प्रयत्न

बुद्धिबळ खेळामध्ये महिलांचा सहभाग वाढावा, बुद्धिबळचा प्रचार- प्रसार व्हावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुली-महिलांसाठी वर्षभर विविध स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आयोजक तथा टीआरएसच्या सचिव तेजस्विनी सागर यांनी सांगितले.

एकूण 50 हजारांचे बक्षीसे

या स्पर्धेत एकूण 50 हजार रुपयांची रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंसह स्व. महर्षी माधवराव बोराडे प्रतिष्ठानच्या वतीने रोख 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत 09 फेऱ्या होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन 08 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 यावेळेत प्रत्येक दिवशी दोन फेऱ्या होतील.

राज्य स्पर्धेतील विजेत्या 13 खेळाडूंची 08 ते 18 नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड होईल. या स्पर्धेत आघाडीच्या महिला मानांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. यात अमरावतीची संस्कृती वानखेडे, पुण्याची अनुष्का कोतवल व आदिती कऱ्हाळे, कोल्हापूरची दिव्या पाटील व दिशा पाटील, तन्वी बोराटे, श्रद्धा बजाज आदींचा समावेश आहे.

औरंगाबादच्या मितालीवर लक्ष्य

स्पर्धेत औरंगाबादकडून जागतीक शालेय चॅम्पियनशिपची विजेता मिताली पाटीलच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष्य असेल. त्याचबरोबर साक्षी चव्हाण, समृद्धी कांबळे, श्रृती काळे, संचिता सोनवणे, अर्चना सोनवणे औरंगाबादच्या मुख्य संघात आहेत. तसेच 7 वर्षीय सानी देशपांडे व 6 वर्षीय मैत्री कऱ्हाळेकर या सर्वात लहान खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील.

बातम्या आणखी आहेत...