आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाटीत अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढणारे रुग्ण आणि त्यांना योग्य उपचार मिळावा यासाठी राज्यस्तरावर नव्याने येऊ घातलेला इमर्जन्सी मेडिसिन वॉर्ड अपघात विभागात तयार करण्यात येत आहे. घाटीतील अपघात विभागात आणखी ३० बेड वाढणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा रुग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी होणार आहे.
घाटीत दररोज दीड ते दोन हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. घाटीची क्षमता ११०० असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा दुप्पट रुग्ण येतात. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असल्याने त्याचा परिणाम उपचारांवर होतो. अपघात विभागात कायम गर्दी असल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी वाट पाहावी लागते. याबाबत अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी सांगितले की, इमर्जन्सी मेडिसिन ही नवीन संकल्पना आहे. या माध्यमातून अपघात विभागात ऑर्थो विभाग शिफ्ट झाल्यानंतर ही सुविधा इथे सुरू होईल. त्यासाठी सर्जरी, गायनिक, ऑर्थो, मेडिसिन यासह विविध विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असणार आहे. प्रत्येक विभागाचे दोन डॉक्टर २४ तास इथे उपलब्ध असणार आहेत. इथे रुग्णांवर उपचार करून नंतर संबंधित विभागात शिफ्ट करता येईल.
एक एप्रिलला ऑर्थो विभाग शिफ्ट ऑर्थो विभाग सीव्हीटीएसमध्ये (उरोशल्यचिकित्सा आणि हदयरोग अतिचिकित्सा विभाग) शिफ्ट केला जाईल. त्यासाठीची तयारी सुरू आहे. एक एप्रिलपर्यंत ऑर्थो विभाग हलवण्यात येणार आहे.
अपघात विभागात वाढणार ३० बेड आपत्कालीन वैद्यकीय सेवेत ३० बेड सुरू करण्यात येणार आहेत. सध्या अपघात विभागात २६ बेड आहेत. तेथे एकूण ५६ बेड होतील. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणेही सोपे ठरणार आहे.
कोरोनानंतर इमारत सध्या आहे रिकामीच सीव्हीटीएस इमारत गेल्या अनेक वर्षांपासून रिकामी आहे. तेथे ९० बेड आहेत. आता हे विभाग सीव्हीटीसमध्ये जाणार आहेत. त्यामुळे या इमारतीचा वापरही होणार आहे. कोरोनाकाळात या इमारतीत रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. अधिष्ठातांनी तेथे डोळे आणि हाडाचे विभाग शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रसूती विभाग खालच्या मजल्यावर आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सध्या केवळ एकच विभाग शिफ्ट होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.