आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीस अडथळा:शहरातील 35 हजारांपैकी 14 हजार ऑटाेरिक्षांची उजवी बाजू उघडी

औरंगाबाद / संतोष देशमुख2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ३५ हजारांपेक्षा अधिक ऑटोरिक्षा आहेत. त्यापैकी चौदा (४० टक्के) हजार ऑटोरिक्षांची उजवी बाजू उघडीच असते, असे ऑटाेरिक्षाचालक संघटनेच्या निरीक्षणातून समाेर आले आहे. हे ऑटाेचालक पोलिस, आरटीओंच्या समाेरून सर्रास प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे वाहतूक नियम, कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यांच्यावर काेणतीही कारवाई होत नसल्यामुळे उजव्या बाजूने प्रवासी चढ-उतार करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण हाेऊन प्रवासी सुरक्षाही धोक्यात आली आहे.

औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी सर्वेक्षण व अभ्यास करून ऑटोरीक्षांची उजवी बाजू बंद असावी. या बाजूने मुख्य रस्ता येत असल्याने रिक्षातून प्रवाशांनी चढ-उतार करू नये, असे सक्त निर्देश दिले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी आरटीओ, पोलिसांनी सुरुवातील पुढाकार घेतला. मात्र, नंतर दुर्लक्ष केले. परिणामी, ४० टक्क्यांवर ऑटोरीक्षाचालकांनी उजवी बाजू बंद केली नाही. ते रोज पोलिस व आरटीओ, प्राधिकरण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या समोरून सर्रासपणे प्रवाशांना घेऊन सुसाट धावतात.

चौकाचौकात पोलिस, सीसीटीव्ही
शहरातील चौकाचौकात वाहतूक पोलिस उभे असतात. तेथे सीसीटीव्ही कॅमेरेही बसवलेले आहेत. या ऑटाेरिक्षाचालकांवर वाहतूक पोलिस कारवाई करत नाही व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नोंद करूनही कारवाई होत नाही. परिणामी, ऑटोरिक्षाचालक उजव्या बाजूने प्रवासी बसवतात व उतरवून देतात. त्यामुळे परिवहन प्राधािकरण समितीच्याच उद्देशांना हरताळ फासला जात आहे.

फिटनेस चाचणीदरम्यान तपासणी, दंड
ऑटोरिक्षाची फिटनेस तपासणी करताना उजवी बाजू बंद आहे किंवा नाही, हे पाहिले जाते. नियमांचे पालन न करणाऱ्यांना १ हजार दंड करत उजवी बाजू बंद करून घेतली जाते. वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी ही मोहीम राबवण्याची गरज आहे. प्रवाशांनी डावीकडून उतरावे. -रामेशचंद्र खार्डे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

नियमबाह्य रिक्षाचालकांवर कारवाई करा
शहरात ४० टक्के ऑटोरिक्षाचालकांनी उजवी बाजू बंद केली नाही. त्यामुळे वाहतूक कायदा, नियम व अटींचे पालन करावे. पोलिस, आरटीओने नियमबाह्य ऑटोरिक्षाचालकांवर कडक कारवाई करून शिस्त लावून प्रवासी सुरक्षेला प्राधान्य द्यावे. -निसार अहेमद खान, अध्यक्ष, ऑटोरिक्षाचालक मालक कृती समिती महासंघ.

बातम्या आणखी आहेत...