आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवाचा रिपोर्ट:शहरातील 780 पैकी 40 गणेश मंडळांनीच घेतली महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी

संतोष देशमुख । औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले होते. त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून शहरातील 780 पैकी केवळ 40 गणेश मंडळांनीच अधिकृत वीज जोडणी घेतली आहे.

गणेशोत्सवाला 31 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. तर 9 सप्टेंबरपर्यंत गणेश उत्साह धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. महावितरणकडून गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या 100 युनिटसाठी केवळ 4 रूपये 71 पैसे प्रति युनिट, 101 ते 300 युनिटसाठी 8 रुपये 69 पैसे प्रति युनिट, 301 ते 500 प्रती युनिट वीज वापरासाठी 11 रुपये 72 पैसे प्रति युनिट आणि 500 युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी 13 रुपये 21 पैसे दराने वीजपुरवठा देण्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच अनधिकृत व घरगुती किंवा अन्य मार्गाने वीज न घेता अधीकृत वीज जोडणी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले होते. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम 2003 नुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

अपघातापासून सावधान

गणेशोत्सवाबरोबरच पाऊस देखील पडतो आहे. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडप व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही योग्यरित्या करावी. मंडपातील वीज यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत ठेवावे. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीच बोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.

विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिनी व रोहित्रांचा गणेशोत्सवातील तसेच मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून प्राणांतिक अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काळजी घेणे अनिवार्य असल्याचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी सांगितले.

येथे संपर्क साधावा

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे निर्माण झाला तर मंडळानी 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जमधडे यांनी केले.

मनपाकडूनही परवानगी घेण्याचे प्रमाण तोकडेच

शासन आदेशानुसार महापालिकेच्या वतीने यंदा गणेश मंडळांना मोफत परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासाठी गणेश मंडळांनी पोलिस, मनपाची परवानगी अनिवार्य केलेली आहे. त्यानुसार शहरातील सातशे ऐंशी गणेश मंडळांनी 31 ऑगस्ट सायंकाळी सात वाजेपर्यंत पोलिसांकडून तर मनपाकडून 260 गणेश मंडळांनी परवानगी घेतली.

बातम्या आणखी आहेत...