आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्च:देशात 11.25 लाखांवर ईव्ही, चार्जिंग स्टेशन केवळ 1742; इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला लोकांचा ओढा

औरंगाबाद | महेश जोशी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागड्या पेट्रोल-डिझेलमुळे देशभरात लोकांचा ओढा इलेक्ट्रिक वाहने म्हणजेच ईव्हीकडे वाढला आहे. देशभरात ईव्हींची संख्या ११.२५ लाखांच्या घरात पोहचली असताना त्या प्रमाणात चार्जिंगच्या सुविधा वाढलेल्या नाहीत. देशभरात अवघी १७४२ पब्लिक चार्जिंग स्टेशन असून एका पॉईंटवर सुमारे ६४४ वाहनांचा भार आहे. एका वाहनाची बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी ४५ मिनिटे ते १ तास लागतो. यामुळे अजून तरी ई-व्हेईकल दुय्यम वा पर्यायी वाहन म्हणूनच वापरावे लागणार आहे. पेट्रोल-डिझेल या जीवाश्म इंधनावर चालणारी वाहने पर्यावरणासाठी घातक असल्याने सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत आहे. सरकारने २०३० पर्यंत ३०% कार, ७०%कर्मशिअल वाहने आणि ८० % दुचाकी-तिनचाकी इलेक्ट्रिवर चालविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी २५ राज्यांनी ई-व्हेइकल धोरण जाहीर केले आहे.

एका स्टेशनवर ६४४ वाहनांचा भार, फुल चार्जिंगला तासाप्रमाणे दिवसही अपुरा
चार्जिंगची अडचण

-ई-वाहनांसाठी बॅटरी हेच इंधन आहे. बॅटरी १००% चार्ज केल्यावर वाहनानुसार २०० ते २५० किमी चालते. पेट्रोल पंप, हॉटेलबाहेर पब्लिक चार्जिंग स्टेशन उभारली आहेत.
-देशात पब्लिक चार्जिंग स्टेशनची संख्या फक्त १७४२ आहे. पैकी ९४० स्टेशन्स मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली व कोलकाता या ९ शहरांतच आहेत.

पाच वर्षांत दुपटीने वाढली ईव्हींची खरेदी, त्या तुलनेत चार्जिंग स्टेशन मात्र मर्यादितच
चार्जिंगच्या तुलनेत पेट्रोल पंपावर लागतो वेळ कमी

देश : एकूण वाहनांची संख्या 28 कोटी 58 लाख 6,720, तर पंपांची संख्या 81,099 आहे. एका पंपावर सरासरी 3524 वाहने इंधन भरतात.
महाराष्ट्र : वाहन संख्या 3 कोटी 14 लाख 51,059 पंप 7468 आहे. एका पंपावर ५ मिनिटांहून कमी वेळ लागत असल्याने अडचण नाही.

एकदा चार्ज केल्यावर फार तर २००- २५० किलोमीटरपर्यंत प्रवास शक्य
केस स्टडी : औरंगाबाद | ७५ ते १०० किमीत दोनच चार्जिंग स्टेशन

मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी अंतर्गत २५० इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली. पैकी १०१ कार नुकत्याच वितरित झाल्या. औरंगाबादच्या चारही बाजूने जाणाऱ्या महामार्गांचा विचार करता वाहनांच्या चार्जिंगची अडचण स्पष्ट होते.

1 औरंगाबाद-पुणे मार्गावर ५, औरंगाबाद-नाशिक-३, औरंगाबाद-मुंबई-८ तर औरंगाबाद-सोलापूर मार्गावर ३ चार्जिंग स्टेशन. 2 दोन चार्जिंग स्टेशनमधील अंतर साधारणपणे ७५ ते १०० किमी आहे. म्हणजे मधेच चार्जिंग संपली तर गाडी ढकलण्याशिवाय पर्याय नाही.

3 इलेक्ट्रिक वाहनांच्या शून्य ते ९०% चार्जिंगसाठी किमान ५५ मिनिटे लागतात. अनेकदा तेथे वाहनांची वेटिंग असते. एवढा वेळ उभे राहण्यास पर्याय नाही. काही स्टेशन हॉटेलबाहेर असल्याने तेथे वेळ घालवता येतो.

चार्जिंगची सोय असल्यास ४५० रुपयांतच औरंगाबादहून पुणे रिटर्न
-४५० रुपये चार्जिंगमध्ये औरंगाबाद-पुणे-औरंगाबाद प्रवास शक्य आहे. पेट्रोल-डिझेल कारने यासाठी ३२०० ते ३५०० रुपये लागतात, असे सतीश मोटार्सचे संचालक सतीश लोढा यांनी सांगितले.
-ई-वाहनाने प्रवासास नियोजन आवश्यक आहे, किती अंतराचा प्रवास, चार्जिंग स्टेशन्स आहे, हे दर्शविणारे अनेक अॅप्स आहे. तसे नियोजन केले तर प्रवास सुखकर ठरतो, असे एक वापरकर्ते म्हणाले.

महाराष्ट्रात ८६,४६९ इलेक्ट्रिक वाहने, सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स मात्र जेमतेमच
भविष्यात देशात वाढतील चार्जिंग स्टेशन्स

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात २५ राज्यांतील ६८ शहरांत २८७७ चार्जिंग स्टेशन उभारण्यास मंजुरी दिली आहे. तसेच, देशातील १६ राष्ट्रीय महामार्ग आणि ९ द्रुतगती महामार्गांवर १५७६ स्टेशन उभारली जातील.

राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दर २५ किमीवर किमान एक, तर लांब पल्ल्याच्या किंवा अधिक अवजड कार्य करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दर १०० किमीवर किमान एक चार्जिंग स्टेशन उभारले जाईल. महाराष्ट्रात ३१७ स्टेशन्स उभारले जातील.

पेट्रोलियम कंपन्या २ वर्षात २२,००० चार्जिंग स्टेशन्स सुरू करतील. यात इंडियन ऑइल १०,०००, भारत पेट्रोलियम ७०००, हिंदुस्तान पेट्रोलियम ५००० स्टेशन सुरू करतील. पैकी काही सुरूही झाली आहेत. महावितरणही चार्जिंग स्टेशन्स सुरू करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...