आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या मृत्यूचे गूढ कायम:पुरलेला मृतदेह चौथ्या दिवशी बाहेर काढला; नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू; शवविच्छेदन अहवालात निष्कर्ष

दौलताबाद /औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाकळी कदम गावात पुरलेला मुलीचा मृतदेह बाहेर काढताना स्थानिक.

सतरा वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत सापडल्यानंतर तिला वडिलांनीच परस्पर रात्रीतून शेतातच पुरल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली. दौलताबाद परिसरातील टाकळी कदीम गावातील मुलीच्या मृत्यूचे गूढ दुसऱ्या दिवशीही कायम हाेते. मृतदेह गुरुवारी बाहेर काढून घाटीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यात नाकातोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले अाहे. टाकळी कदम गावातील राधा कैलास जारवाल हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिला रात्रीतून पुरल्याची माहिती बुधवारी दौलताबाद पोलिसांना मिळाली हाेती. ही घटना 20 सप्टेंबर रोजी घडली हाेती.

पाेलिसांनी राधाचे वडील, आई, दोन बहिणी व दोन भावांची चौकशी केली. सुरुवातीला काहीही न बोलणारे तिचे वडील कैलास यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला, मी तिला रात्रीतून पुरल्याची कबुली दिली. परंतु, मृत्यू कसा झाला, काय घडले, परस्पर रात्रीतून एकट्याने का पुरले यावर माैन बाळगले. पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी त्यांना विहिरीजवळ नेऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर गाेंधळ घालत उत्तरे देण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर गुरुवारी मृतदेह पुन्हा वर काढून शवविच्छेदन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता.

दगड, मातीचा थर, आजूबाजूला बाभळीचे काटे ठेवले
गुरुवारी दुपारी 12 वाजता दौलताबाद पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे, सहायक निरीक्षक डी. बी. तडवी, उपनिरीक्षक रवी कदम, आर.बी. राठोड, सुधीर गायकवाड, सुदर्शन राजपूत, व्ही. एस. खंडागळे यांचे पथक दाखल झाले. पोलिस पाटील उदयसिंग जारवाल, राधाचे वडील कैलास, आई व जवळच्या नातेवाइकांना बोलावण्यात आले. त्यानंतर गंगापूरचे नायब तहसीलदार अविनाश अंकुश, तलाठी गणेश लोणे, विश्वनाथ नागुर्डे, घाटीचे डॉक्टर, सरपंच, पंच दाखल झाल्यानंतर राधाचा मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली.

कैलास यांनी मुलीला पुरल्याची जागा दाखवली. तिचे डोके-पाय कुठल्या दिशेला आहे, हे सांगितले. जवळपास तीन फूट खोल खड्डा खाेदला होता. खाली कपडा टाकला होता. राधाला दोन बेडशीटमध्ये गुंडाळले. त्यानंतर आजूबाजूला बाभळीच्या काटेरी फांंद्या टाकल्या. त्यानंतर दगड, त्यावर माती, पुन्हा दगड व शेवटी माती टाकली. राधाला वर काढल्यानंतर आईकडून ओळख पटवून घेतली. तिच्या आई-वडिलांसह सर्व जण स्तब्ध होऊन हा घटनाक्रम पाहत होते. मृतदेह फारसा कुजलेला नसल्याने पोलिस, डॉक्टरांनी चर्चा करून घाटी रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला.

आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे, पण परस्पर का पुरले ?

  • राधाचा मृत्यू नाकातोंडात पाणी गेल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. व्हिसेरा अंतिम अहवालासाठी राखून ठेवला. संध्याकाळी राधाचा मृतदेह पुन्हा कुटुंबाकडे सुपूर्द केला. तीन दिवसांपूर्वी मुलीला परस्पर पुरणाऱ्या वडिलांनीच तिला मुखाग्नी दिला.
  • राधाने स्वत: विहिरीत उडी मारली की घातपात झाला, या दिशेने आता पोलिस तपास करत आहेत.
  • मुलीने आत्महत्या केली, असे कुटुंब सांगत असले तरी रात्री नातेवाईक निघून गेल्यानंतर वडिलांनी एकट्याने खड्डा खोदून, दगड, काटे टाकून राधाला का पुरले, हा प्रश्न आहेच.
बातम्या आणखी आहेत...