आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्राणवायूत आत्मनिर्भर:तीन महिन्यांत ऑक्सिजन हब; जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे 17 प्रकल्प उभारणार

औरंगाबाद15 दिवसांपूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक
  • आठ खासगी रुग्णालयांचाही सहभाग, जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केला आराखडा
  • कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकार, स्थानिक प्रशासनाचा पुढाकार

कोरोना रुग्णांना जीवदान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा ऑक्सिजन हवेतून निर्माण करणारे प्रकल्प औरंगाबादेतील चार रुग्णालयांनी उभे केले. त्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले. त्याची दखल आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे यांनी घेतली. त्यामुळे उत्साह वाढलेल्या जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एक आराखडा तयार केला आहे. त्यानुसार येत्या एक ते तीन महिन्यांत औरंगाबाद शहर, जिल्ह्यात ९ सरकारी, ८ खासगी रुग्णालयांत हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे १७ प्रकल्प उभे राहतील. त्यापैकी तीन सर्वाधिक रुग्णभार असलेल्या घाटी रुग्णालयात असतील.

औरंगाबाद शहराला सध्या दररोज ६२, तर मराठवाड्याला १८० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. मात्र, तेवढा पुणे, नागपूर, रायगड येथून उपलब्ध करणे जिकिरीचे होत आहे. म्हणून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ठरवले. औरंगाबाद जिल्ह्याचा आराखडा चव्हाण यांनी सर्व मोठ्या रुग्णालयांशी चर्चा करून अंतिम केला आहे.

शहरातील ही आठ खासगी रुग्णालये
जिल्हाधिकाऱ्यांनी एमजीएम, हेडगेवार, धूत, जे. जे. प्लस, कमलनयन बजाज, मेडिकव्हर, ईश्वर, ओरियन सिटी केअर या खासगी रुग्णालयांना प्रकल्प उभारण्यास सांगितले आहे.

  • कन्नड, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, सोयगाव
  • जिल्हा रुग्णालय मिनी घाटी : ६० क्युबिक मीटर प्रति तास
  • उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर – २० क्यु. मी. प्रति तास
  • उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर - २० क्यु. मी. प्रति तास
  • उपजिल्हा रुग्णालय, सिल्लोड - २० क्यु. मी. प्रति तास
  • ग्रामीण रुग्णालय, कन्नड - २० क्यु. मी. प्रति तास
  • ग्रामीण रुग्णालय सोयगाव - २० क्यु. मी. प्रति तास

आता ग्रामीण भागालाही होईल मदत
जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात प्रकल्प होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागालाही मदत होईल. सिलिंडर खरेदी तसेच दररोजच्या वाहतुकीवरील लाखो रुपयांचा खर्चही कमी होऊ शकतो. - सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी

घाटीच्या तीन विभागांत तयारी
घाटी रुग्णालयातील मेडिसिन, सर्जरी, सुपरस्पेशालिटी प्रकल्प उभे राहतील. एका प्रकल्पातून २०५ सिलिंडर प्राणवायू मिळेल. एका रुग्णाला पंधरा लिटर प्रति मिनिट याप्रमाणे शंभर रुग्णांना २४ तास एका प्रकल्पातून पुरवठा होऊ शकेल. डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

‘धूत’चा प्रकल्प ३०० सिलिंडरचा
धूत हॉस्पिटलचे सीईओ डॉ. हिमांशू गुप्ता म्हणाले की, ५८ सिलिंडरसाठी किमान ५० लाख रुपये लागतात. आम्ही ३०० सिलिंडरचा प्रकल्प उभारत आहोत. आमच्याकडे १० किलोलिटरचा टँक आहे. त्यातून छोट्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचा विचार आहे.

८ दिवसांत प्रकल्प उभारणे सहज शक्य
आवश्यक यंत्रसामग्री आणल्यावर आठ दिवसांत प्रकल्प उभा राहू शकतो. मात्र, राज्यभरात मागणी वाढल्याने यंत्रसामग्री मिळण्यापासून ते प्रकल्प उभारणीपर्यंत एक ते तीन महिने लागू शकतात.

घाटीला सहा तास पुरेल
घाटीत सध्या ७५० बेड तयार आहेत. सध्या तेथे रोज १८ मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. प्रकल्प सुरू झाल्यावर जम्बो सिलिंडरची गरज भासणार नाही. पाइपलाइनने प्राणवायू थेट रुग्णांना बेडवर देता येईल. घाटीत ६० क्युबिक मीटर प्रतितास अशा क्षमतेचे तीन प्रकल्प सुरू होतील. एका प्रकल्पातून २०५ जम्बो सिलिंडर ऑक्सिजन मिळू शकतो. घाटीला एका तासाला शंभर सिलिंडर लागतात. हे लक्षात घेता सहा तास लिक्विड ऑक्सिजनची गरज भासणार नाही, असे भूलशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राजश्री सोनवणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...