आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:ऑक्सिजनच्या किमतीत वर्षभरात 66 ते 140%, तर मागणीत चौपट वाढ

औरंगाबाद / अजय कुलकर्णी, रोशनी शिंपी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा अनेक रुग्णांच्या प्राणांवर बेतला. कोरोनाच्या काळात वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीत ६६ ते १४० टक्के एवढी वाढ झाली आहे. याच काळात विशेषत: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या मागणीत चौपट वाढ झाली आहे. घरगुती तसेत रुग्णालयात वापरासाठीच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या किमतीतही दुपटीने वाढल्या आहेत.

यासंदर्भात औरंगाबाद येथील ऑक्सिजनचे पुरवठादार अब्दुल हकीम यांनी सांगितले की, सध्या १० लिटरच्या ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. कोरोनापूर्वी या सिलिंडरची किंमत ५० ते ६० रुपये होती, आता ती १०० रुपये झाली आहे. दुसऱ्या प्रकारच्या जम्बो सिलिंडरलाही रुग्णालयातून मोठी मागणी आहे. यात ४७ लिटर ऑक्सिजन असतो. त्यात प्राणवायू भरून देण्यासाठी वर्षभरापूर्वी २५० रुपये लागायचे, सध्या ३५० रुपये लागतात. सध्या आम्ही रुग्णालयांना ७०० ते ८०० सिलिंडरचा रोज पुरवठा करतो. वर्षभरापूर्वी अत्यंत कमी मागणी होती. आता मागणीत चार ते पाच पटीने वाढ झाली आहे.

घरगुती तसेच रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करणारे अकबर शेख यांनी सांगितले की, आॅक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा वापर सध्या वाढला आहे. घरगुती वापरासाठी सध्या २५ कॉन्सन्ट्रेटर किरायाने दिलेले आहेत. जवळपास ३० ते ४० जण प्रतीक्षेत आहेत. सध्या महिन्याला ६५०० रुपये असा किराया आहे. कोरोनापूर्वी हाच दर ३ ते ४ हजार रुपये होता. तर अब्दुल हकीम यांनी सांगितले की, आमच्याकडे नऊ कॉन्सन्ट्रेटर आहेत. सध्या सर्व किरायाने दिलेले आहेत. आम्ही दिवसाला २०० रुपये किराया आकारतो. कॉन्सन्ट्रेटरला वर्षभर मागणी असते. दमा असणाऱ्या रुग्णांसाठी हे कॉन्सेन्ट्रेटर उपयुक्त ठरते. औरंगाबादेत झैनब एन्टरप्रायजेस, सुशील गॅस, सागर गॅस, अपेक्षा , अकबर गॅसेस आदी पुरवठादार आहेत. त्यांच्याकडील ऑक्सिजनच्या मागणीत पाचपटीने वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या सिलेंडरसाठी १० हजार रुपये तर छोट्या सिलेंडरसाठी ५ हजार रुपये डिपॉझिट हे पुरवठादार आकारतात.

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर ४५ वरून ९० हजारांवर : ऑक्सिजनकॉन्सेन्ट्रेटर हे सभोवतालच्या हवेतून प्राणवायू एकत्रित करून तो उपलब्ध करुन देणारे एक वैद्यकीय उपकरण आहे. वातावरणातील हवेत ७८ टक्के नायट्रोजन तर २१ टक्के ऑक्सिजन असतो तर एक टक्का इतर वायू असतात. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर हे वायूमधून ऑक्सिजन एकत्रित करते, ते शुद्ध करते, नायट्रोजन पुन्हा हवेत सोडते आणि ऑक्सिजन उपलब्ध करुन देते. यातून मिळणारा प्राणवायू ९० ते ९५ टक्के शुद्ध असतो. त्यातील प्रेशर व्हॉल्व मुळे त्यातून कॉन्सेन्ट्रेटरच्या क्षमतेनुसार रुग्णाला मिनिटाला एक ते १० लिटर प्राणवायूचा पुरवठा केला जातो. हे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या किमती आता ८० ते ९० हजारांच्या घरात पोहोचल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर ४५ ते ५० हजार रुपयांत उपलब्ध होते.

{मुंबई, पुण्यासारख्या शहरात छोटे सिलिंडर रिफिलिंगचा दर ५०० ते ८०० रुपये आहे. वर्षभरापूर्वी तो १५० ते २५० रुपये होता. तर छोट्या शहरांत हा दर ४०० ते ६०० रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...