आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद मनपाला खंडपीठाने फटकारले:मंगळावर ऑक्सिजन पोहोचला; पण शहरात चौथ्या दिवशी पाणी मिळेना

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे चंद्र आणि मंगळ ग्रहावर ऑक्सिजन नेण्याची तयारी केली जात आहे. दुसरीकडे औरंगाबादच्या नागरिकांना महापालिका चौथ्या दिवशीही पाणीपुरवठा करू शकत नाही, अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अरुण पेडणेकर यांनी मंगळवारी व्यक्त केली. मनपाने आता तरी पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करून प्रत्येक चौथ्या दिवशी शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिलेच पाहिजे. यात कुठलाही परंतु, किंतू ऐकून घेतला जाणार नाही. अवैध नळांविरोधातही मोहीम गतिमान करा, असे आदेशही न्यायालयाने बजावले आहेत. पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी होईल. न्यायालयाचे मित्र म्हणून अॅड. सचिन देशमुख, राज्य शासनातर्फे अॅड. ज्ञानेश्वर काळे, केंद्रातर्फे भूषण कुलकर्णी, एमजेपीतर्फे अॅड. विनोद पाटील, मनपातर्फे अॅड. संभाजी टोपे यांनी काम पाहिले.

खंडपीठ : शहरात किती दिवसांनी पाणीपुरवठा होतो? मनपाचे वकील : प्रत्येक चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे. खंडपीठ : खरंच चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होतो? मनपा वकील : म्हणजे ४ दिवसांत पाणीपुरवठा केला जात आहे. ९५५ अवैध नळजोडण्या तोडल्या. खंडपीठ : (उपस्थित सर्व वकिलांना उद्देशून ) प्रत्येक चौथ्या दिवशी पाणी येते हे खरे आहे? उपस्थित वकील : नाही सर, चार दिवसांनंतर म्हणजे पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. खंडपीठ : महापालिका प्रत्येक चौथ्या दिवशी पाणीपुरवठा का करू शकत नाही? मनपा वकील : पुरेशा प्रमाणावर पाणी उपलब्ध होत नाही. जेवढी गरज आहे तेवढे पाणी लिफ्ट होत नाही. विजेच्या माध्यमातून पाणी लिफ्ट केले जाते. खंडपीठ : सारखी-सारखी तीच उत्तरे देऊ नका. चंद्र आणि मंगळावर ऑक्सिजन नेण्यापर्यंत आपण प्रगती केली आहे अन‌् शहरात चौथ्या दिवशी पाणी देऊ शकत नाही? यापुढे काही ऐकले जाणार नाही. प्रत्येक चौथ्या दिवशी पाणीपुरवठा झालाच पाहिजे. वितरण प्रणालीत सुधारणा करा. मनपा वकील : शहरातील नागरिकांना चार दिवसाला पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. परंतु पाणी वितरणात अडचणी खूप आहेत. इतक्यात ते शक्य होणार नाही. खंडपीठ : काहीही सबब सांगून आता चालणार नाही. शहरात चौथ्या दिवशी पाणीपुरवठा झालाच पाहिजे. अवैध नळांवरील कारवाईचे आदेश दिले होते त्याचे काय झाले? मनपा वकील : १३ मे ते १ सप्टेंबर २०२२ या तीन महिन्यांत मनपाच्या पथकाने शहरात ही मोहिम राबवून ९५५ अवैध नळ तोडले आहेत. खंडपीठ : शहरात दीड लाखावर अवैध नळांची संख्या असताना फक्त ९५५ तोडलेत? मनपा वकील : मोठ्या परिश्रमपूर्वक कारवाई केली जात आहे. मनपाला पोलिस संरक्षण मिळत नाही. खंडपीठ : पोलिस संरक्षणात काय अडचण आहे? मनपा वकील : मध्येच गणेशोत्सव आल्यामुळे तिकडे पोलिस संरक्षण वाढले. गणेशोत्सवानंतर पुन्हा मोहीम गतिमान केली जाईल. नवीन पाणीपुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर असून त्यांनी लवकरात लवकर जलवाहिनी टाकण्याचे काम करायला हवे.

बातम्या आणखी आहेत...