आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआई - वडिलांनी मुलांना पैसे निर्माण करणारी मशीन बनवून टाकले आहे. पैसे देऊन शिक्षण सुरू झाल्याने सरस्वती गेली, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. हिमंतराव बावस्कर यांनी केले. ते शनिवारी औरंगाबाद येथे बोलत होते.
ज्ञान यज्ञ फाऊंडेशनच्यावतीने आयोजित पद्म महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विंचू दंशावरील औषधांचे संशोधन करणाऱ्या डॉ. बावस्करांनी शिक्षण पद्धती, कल्पकता, संशोधन या विषयावर संवाद साधला. त्यांनी पालकांना आणि मुलांना दिलेल्या टिप्स त्यांच्याच शब्दांत...
शिक्षण कसे हवे?
जोवर सर्वांना मोफत शिक्षण मिळत होते तोवर सरस्वती इथे निवास करत होती. आता पैसे देऊन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे सरस्वती निघून गेली आहे. शिक्षण असे हवे जे पुढील अनेक पिढ्यांना काही देऊन जाईल. आई - वडिलांनी मुलांना पैसे निर्माण करणारी मशीन बनवून टाकले आहे. हे थांबवले नाही तर भविष्य तुम्हाला माफ करणार नाही. आजच्या काळात सरकारी शाळा, मोफत शिक्षण कालबाह्य होत चालले आहे.
अशा वाढतील क्षमता
आजच्या काळात वेगवान जीवन झाले आहे. मुले १२-१२ तास अभ्यास करत आहेत. पण, यामुळे काहीच होणार नाही. मुले पैसे कमावणारे मशीन होत आहेत. एवढा वेळ मी कधीच अभ्यास केला नाही. अभ्यासाला कमी वेळ द्या आणि खेळाला खूप वेळ द्या. यातून तुमच्या क्षमता विविध पातळ्यांवर वाढत जातील, ज्याचा फायदा शिक्षणाला होईल.
पुस्तकावर प्रेम करा
मुलांनो तुम्ही पाटी पुस्तकावर प्रेम करा, गुगलवर करू नका. मी शिक्षणासाठी प्रचंड मेहनत केली आहे. मंदिराच्या प्रांगणात राहून काम करायचो, खायचो आणि शिक्षण घेत गेलो. पुढल्या वर्गाची पुस्तक घेता यावीत यासाठी उन्हाळी सुट्यांत काम करायचो. हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. कधी कधी उष्ट अन्न खाल्ले, पण हे सांगण्याची आज पद्मश्री मिळाल्यावरही लाज वाटत नाही. मी कष्टाने सर्वकाही मिळवले आहे, याचा अभिमानच वाटतो.
स्कॉलर निर्माण होत नाहीत
पूर्वी डॉक्टर्स, इंजिनियर घडवण्यासाठी शासकीय संस्थाच होत्या. त्यामुळे जी मुले दर्जेदार असतील तीच हे शिक्षण घेत होती, पण आज डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, त्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा ओतून खासगी महाविद्यालयातून डॉक्टर्स, इंजिनियर घडवले जातात. यामुळे आपण मानवतेवर अन्याय करतो आहोत. शासकीय संस्थेत घडतील तितकेच लोक त्या प्रोफेशन योग्य आहेत, हे लक्षात ठेवा.
भ्रष्टाचार करू नकोस
माझ्या आई आणि मोठ्या भावामुळे मी घडत गेलो. सरकारी नोकरीत असताना आई म्हणाली होती, ‘आपल्यासारखे अनेकजण असतील ज्यांना तुझ्या मदतीची गरज आहे. मदत कर. भ्रष्टाचार करू नकोस. केलास तर तुझी जमानत द्यायला आम्ही कधीच येणार नाही.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.