आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:‘तुमचा तो करूना तर आता आलंय, आमी तर रोजच मरतूया’

पैठण2 वर्षांपूर्वीलेखक: प्रविण देशपांडे
  • कॉपी लिंक
  • कुटुंबाचे हेलकावे सांभाळत थर्माकोलच्या होडीतून मासेमारी करणाऱ्या छायाताईंची व्यथा

मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडीमुळे शेती, उद्योगांची भरभराट झाली. या धरणाने सर्वांचीच तहान भागवली. पण, नाथसागराच्या काठावर पालात राहणाऱ्या छायाबाई व त्यांच्यासारख्या हजारो वंचित, गरिबांच्या हलाखीच्या जगण्यात लॉकडाऊननं अधिकच भर टाकली

नाथसागराच्या कुशीत वावरणाऱ्या पंचविशीतील गणेशला विचारले, आतासारखे संकट कधी पाहिले होते का? तितक्यात तुराट्याच्या काड्यांनी बनवलेल्या आणि शेणानं सावरलेल्या झोपडीतून त्याची काकू म्हणाली, ‘हे करूना तर आता आलंय, आमी तर रोजचं मरतूया…’ ती विस्तारांन सांगू लागली तसं तिचा संघर्ष डोळ्यासमोर उभा राहत होता. पतीचे निधन झालेले, एक विवाहित मुलगी व १८ वर्षांच्या दिव्यांग मुलाला घेऊन १७ वर्षांपासून छायाबाई सुभाष कुचे (४७) धरणात मासेमारी करून जीवन जगतात. सूर्य मावळायच्या वेळी थर्माकोलच्या तकलादू होडीवर स्वार होऊन धरणाच्या मध्यभागी जाळे टाकतात आणि उगवतीच्या वेळेला पुन्हा जाऊन मासे घेऊन येतात. इतका धोका पत्करून त्यांना मिळते काय तर दिवसाला फक्त २०० रुपये. पण, पोटापाण्यासाठी त्यांनी हे काम आनंदाने स्वीकारले आहे.

कांताबाई व त्यांच्या मुलांचे हाल

छायाबाई यांच्याप्रमाणे त्यांची जाऊ कांताबाई यांचेही हाल आहेत. छायाबाईंच्या झोपडीच्या बाजूलाच कांताबाई व त्यांची सहा मुले राहतात. यातील तिघे जण मासेमारी करतात. तर, तिघे पैठणजवळ मासे विकणे व गुरे चारण्याचे काम करतात. आमचा जन्मच झोपडीत झाला. शासनाच्या घरकुल योजनेत नाव आले पण अद्याप लाभ मिळालेला नसल्याचे गणेश कुचे यांनी म्हटले. तर लॉकडाऊननंतर या भागात पर्यटक व हौशी छायाचित्रकार येणे बंद झाल्याचे अर्जुन कुचे याने सांगितले.

वादळ, वारं आलं तर होडी उलटण्याची भीती

मासेमारीसाठी खोल पाण्यात जाताना पावसाळ्यात अनेकदा वादळ, वारं येतं. धरणात टाकलेल्या जाळ्यापर्यंतही पोहोचता येत नाही. होडी उलटण्याची भीती असल्याने धरणाचा काठ गाठावा लागतो. त्यामुळे मासे तर मिळतच नाहीत. पण, जाळेही तुटून जाते. जेव्हा असे घडते त्या दिवशी उपासमार ठरलेली असते.

बातम्या आणखी आहेत...