आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कुटुंबीयांच्या शोधासाठी गीता पुन्हा महाराष्ट्राच्या वाटेवर; तीन महिने परभणीत मुक्काम करणार, पूर्णा-गंगाखेडला देणार भेट

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • इंदूरच्या ज्ञानेंद्र पुरोहित यांची नव्याने शोधमोहीम, राज्य सरकारकडे मदतीची हाक

तब्बल पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात परतलेल्या मूकबधिर गीताच्या कुटुंबीयांच्या शोधासाठी दुसरी मोहीम आता महाराष्ट्रात राहून पूर्ण केली जाणार आहे. तिने सांगितलेल्या वर्णनावरून तिचे गाव रेल्वेमार्ग आणि गोदावरी काठावर आहे. पहिल्या मोहिमेतून गीता पूर्णा, गंगाखेड किंवा या परिसरातील असल्याचे संकेत मिळाले. सतत येणे-जाणे अवघड होत असल्याने आता परभणीत किमान तीन महिने मुक्काम करूनच माेहीम फत्ते करण्याचा इंदूरच्या आनंद सर्व्हिस सोसायटीने निर्धार केला आहे. त्यासाठी सोमवार, २८ डिसेंबर रोजी गीता पुन्हा महाराष्ट्रात परत येत आहे.

इंदूरचे सांकेतिक भाषातज्ञ ज्ञानेंद्र पुरोहित यांनी संवाद साधल्यावर गीताचे हे गाव मराठवाडा-तेलंगण सीमेवर असल्याचे संकेत मिळाले होते. आतापर्यंत ४८ लोकांनी गीताचे पालक असल्याचा दावा केलाय. पैकी ३० जणांची डीएनए टेस्ट झाली. ती निगेटिव्ह आली. उर्वरित लोकांनाही गीताने ओळखण्यास नकार दिला. सतत इंदूरहून येणे कठीण असल्याने आता परभणीत मुक्काम करून आसपासच्या गावात शाेध घेतला जाणार आहे. यासाठी परभणीतील महाराष्ट्र राज्य मूकबधिर मंडळाचे अध्यक्ष मनोज पटवारी, उपाध्यक्ष अनिकेत शेलगावकर आणि पहल फाउंडेशन तसेच रेल्वे प्रवासी सेनेचे संस्थापक संतोषकुमार सोमाणी सहकार्य करणार आहेत. हा शोध घेतानाच ३ महिने फाउंडेशनमध्ये गीताला स्वयंपूर्ण करण्यासाठी काही कौशल्ये शिकवली जातील, असे पुरोहित यांनी सांगितले.

राज्य सरकारने सहकार्य करावे
महाराष्ट्रात काम करण्यासाठी मध्य प्रदेश सरकार आम्हाला मदत करणार नाही. या कामात मोठा खर्च ,मनुष्यबळ लागणार आहे. महाराष्ट्र सरकार, परभणीचे खासदार संजय जाधव आणि स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे. गीता ‘भारत की बेटी’ आहे. तिच्या कुटुंबीयांना शोधणे हे राष्ट्रीय कार्य आहे. -ज्ञानेंद्र पुरोहित, सचिव, आनंद सोसायटी,

पहिल्या मोहिमेतून अपेक्षा वाढल्या
११ ते १९ डिसेंबरदरम्यान ज्ञानेंद्र पुरोहित आणि गीता यांनी औरंगाबाद, लासूर स्टेशन, जालना, परभणी, गंगाखेड, पूर्णा, धर्माबाद, नांदेड, बासर आणि नाशिक येथे गीताच्या घराचा शोध घेतला. यादरम्यान ३ जणांनी गीताचे कुटुंबीय असल्याचा दावा केला. परंतु गीताने त्यांना ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा ती इंदूरला गेली होती.

बातम्या आणखी आहेत...