आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट भाष्य:पाकिस्तान : गणवेशधारी हुकूमशहांचा वारसा

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्या हुकूमशहाने पाकिस्तानचे अधिक नुकसान केले, यावर इतिहासकार वाद घालतील, तेव्हा झिया यांच्याविरोधात मुशर्रफ यांचे नाव पुढे येईल.

हुकूमशहांच्या नशिबी तीन परिणाम
पुढील तीनपैकी एक परिणाम पाकिस्तानच्या हुकूमशहाच्या नशिबी असतो - एक तर त्याचे वारसदार त्याची हत्या करतात किंवा त्याला तुरुंगात टाकले जाते किंवा भारताशी युद्ध सुरू करून आणि पराभवाचा सामना केल्यानंतर त्याला देशाबाहेर काढले जाते. मुशर्रफही चांगल्या जनरलप्रमाणे गोल्फ खेळत राहण्यासाठी निवृत्त होऊ शकत नव्हते. ते त्यांनाही ते नको होते.

परवेझ मुशर्रफ यांच्यासाठी शोक लेख लिहिण्याची वेळ अद्याप आलेली नाही. याची तीन कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शरीराचे अवयव निकामी होतात, तरीही आधुनिक जीवनरक्षक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना दीर्घकाळ जिवंत ठेवता येते. दुसरे कारण म्हणजे १५ वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने स्वत:वर आणि शेजारी देशावर अत्याचार केले, ती व्यक्ती आपल्याच देशासाठी तुच्छ झाली आहे, म्हणून तुम्ही म्हणू शकता ते राहिले वा न राहिले तरी काय फरक पडतो? आणि तिसरे कारण म्हणजे वाईट समजले जाणारे आणि विशेषतः गणवेशातील हुकूमशहा कधीही मरत नाहीत. ते आपल्या मागे विनाश आणि द्वेषाचा वारसा सोडतात.

आजही ‘झियावाद’ पाकिस्तानच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत आहे, पण त्याचे फारसे भले झाले नाही. झियांनी लष्करी इस्लामवाद्यांना दिलेले प्रोत्साहन आणि निर्यातयोग्य जिहाद यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था व समाज आज अशांत आहे. झिया यांनी विषारी झाडाचे बी पेरून त्याचे संगोपन केले, या झाडाची फळे तोडून आपण आपल्या देशाचे हीरो बनू, असे मुशर्रफ यांना वाटले. पण ते झीरो झाले, संविधान नष्ट केल्याबद्दल दोषी ठरले, न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, इस्लामिक कायद्यानुसार वैयक्तिकरीत्या उपस्थित नसलेल्या व्यक्तीवर खटला चालवणे चुकीचे आहे. दुबईच्या हॉस्पिटलमध्ये अधूनमधून ट्विटरवरून शेखी मिरवणे किंवा रुग्ण म्हणून स्वत:ची छायाचित्रे पोस्ट करण्यापर्यंत त्यांचे आयुष्य आता मर्यादित झाले आहे. गेल्या चार दशकांत मुशर्रफ हे पाकिस्तानचे एकमेव महत्त्वाचे नेते होते, ज्यांची मला औपचारिक मुलाखत घेता आली नाही. तथापि, कधी कधी त्यांच्याशी एकट्याने किंवा काही लोकांमध्ये मोकळेपणाने संभाषण होत होते. ते सर्वात अहंकारी आणि कमी बुद्धिमत्ता असलेल्या नेत्यांपैकी आहेत. १९९९ मध्ये त्यांनी नेतृत्व केलेले बंड सोपे होते. १९५१ चे पहिले तथाकथित ‘रावळपिंडी षड््यंत्र’ वगळता पाकिस्तानमध्ये कोणताही लष्करी उठाव अयशस्वी झाला नाही. पाकिस्तानातील विद्यमान लष्करप्रमुखांसाठी सत्ता हस्तगत करणे म्हणजे १११ ब्रिगेडमधील काही मुलांना चाव्या मिळवण्यासाठी निवडून आलेल्या नेत्याच्या घरी पाठवण्यासारखे आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्तापालट का झाला?

त्या वर्षाची सुरुवात फेब्रुवारीमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या लाहोर बस दौऱ्याने झाली, त्यामुळे परस्पर संबंधांमधील तणाव कमी झाल्याचे सूचित होते. दुसरीकडे हे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मुशर्रफ कारगिल हल्ल्याची योजना आखत होते. कारगिलमध्ये ते अयशस्वी झाले, त्यांच्या वझीरे-आझमने त्यांना पदच्युत केले, पण शांततेसाठी केलेले प्रयत्न विफल करण्यापासून ते मागे हटले नाहीत. कारगिल युद्धात पराभवाने थकलेल्या जनरल्सना बरोबर घेऊन त्यांनी सत्तापालट केला. काश्मीर खोऱ्यात रक्तपात सुरू झाला. विमानाचे अपहरण, बंदिवान हवाई प्रवाशांच्या बदल्यात भयंकर दहशतवाद्यांची सुटका, श्रीनगर विधानसभेवर बॉम्बस्फोट आणि नंतर भारतीय संसदेवर हल्ला, या सर्व गोष्टींनी त्यांच्या देशाला भारताबरोबर युद्धाच्या उंबरठ्यावर आणले. अमेरिकेच्या ९/११ च्या घटनेनंतर मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला आपला प्रमुख मित्र म्हणून सादर केले, तथापि त्यांनी अल-कायदा आणि तालिबानशी संगनमत करून अमेरिकेची फसवणूक सुरू ठेवली.

परंतु, त्यांनी ज्या जिहादींना पाठिंबा दिला ते त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेले. ते सरकारमधील सरकारसारखे बनले आणि पाकिस्तानने ‘दहशतवादाविरुद्धच्या युद्धात’ अमेरिकेचा भागीदार व्हावे हे त्यांना मान्य नव्हते. या निष्ठावंतांनी त्यांच्या जीवनावर अनेक हल्ले केले, पण ते बचावले. पाकिस्तानातील प्रत्येक हुकूमशहाने आपापल्या प्रकारची लोकशाही राबवण्याचा प्रयत्न केला आहे. फील्ड मार्शल अयुब खान याला ‘निर्देशित लोकशाही’ म्हणत असत. सिंहासन अबाधित आहे तोपर्यंत याह्या खान काही राजकीय घडामोडींना, अगदी निवडणुकांना परवानगी देण्यास तयार होत. झिया यांनी बनावट ओपिनियन पोलद्वारे सत्ता बळकट करून ‘पक्षविहीन’ लोकशाहीचा वापर केला. मुशर्रफ यांनी त्यांच्या ‘सीव्ही’मध्ये लोकशाहीच्या प्रयोगाचा अध्यायदेखील जोडला, नवीन राज्यघटना आणण्याचा प्रयत्न केला, उच्च न्यायव्यवस्थेशी संघर्ष केला आणि अखेरीस रस्त्यावरील लोकशाही समर्थक आंदोलनांमध्ये खुर्ची गमावली. आता ते आग्रा शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उद्धटपणे आलेल्या माणसापेक्षा पूर्णपणे वेगळे दिसतात, याबद्दल आय. के. गुजराल म्हणाले होते की, आपण विजयी आहोत आणि हरलेल्या देशात आलो आहोत, असे ते वागत होते. मुशर्रफ २००७ पर्यंत नेते म्हणून अपयशी ठरले होते, पण तोपर्यंत त्यांचे बरेच नुकसान झाले होते. हे आपण बेनझीर यांची हत्या, २६/११चे हल्ले आणि ओसामा बिन लादेनसाठी अबोटाबादमधील हल्ल्याच्या रूपात पाहिले.

पाकिस्तानच्या लष्करी हुकूमशहाच्या ‘मीदेखील लोकशाहीवादी’ या कट्टरतेचा आढावा घेण्यासाठी मला मुशर्रफ यांच्या व्याख्यानाचा संदर्भ घ्यायचा आहे, ते त्यांनी २००४ मध्ये ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये दिले होते. निमंत्रित प्रेक्षक म्हणून मी एक प्रश्न विचारला आणि त्यांना आठवण करून दिली की, त्या वर्षी अनेक लोकशाही देशांत निवडणुका होणार आहेत, मग तुम्ही पाकिस्तानात कधी निवडणुका घेणार आहात? आम्ही लोकशाही देश नाही, असे तुम्ही कसे म्हणता, असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यांच्या आजच्या जीवनाकडे पाहिले तर ते सत्य स्वीकारतील. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

शेखर गुप्ता एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta

बातम्या आणखी आहेत...