आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात १५ मार्चपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीच्या संकटाने हजारो हेक्टर शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी सलग चौथ्या दिवशीही मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसला. वीज कोसळून विदर्भात दोघांचा व नाशिक जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी मराठवाड्यात पाच जणांचा बळी गेला होता. रविवारीही काही भागात पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे. सोमवारनंतर मात्र हे अवकाळी संकट सरेल, अशी शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महसूल कर्मचारी संपावर असल्यामुळे अजून पंचनामे सुरू झालेले नाहीत मग भरपाई मिळणार कधी, या चिंतेत बळीराजा आहे. दरम्यान, अतिवृष्टीने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची शिंदे सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट भरपाई दिली होती. आताही त्याच धर्तीवर मदत दिली जाईल. त्याची घोषणा राज्य सरकार गुढीपाडव्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाडा : १६ हजारांवर हेक्टर पिकांचे नुकसान छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, व हिंगोली जिल्ह्यात शनिवारीही गारपीट झाली. मराठवाड्यात १५ ते १७ मार्चपर्यंत तब्बल १६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक फटका नांदेड व छत्रपती संभाजीनगरला बसला. या दोन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे ८,२७३ व ७,७६२ हेक्टर (३३ टक्के) शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इतर जिल्ह्यातील नुकसानीची अजून नोंद झाली नाही. या विभागात सहा जणांचे बळी गेले आहेत. ज्वारी, गहू, मका या रब्बी पिकांसोबतच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
विदर्भ : विद्यार्थिनी, तरुणाचा मृत्यू; पिकांचे मोठे नुकसान विदर्भाला शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी गारपिटीचा फटका बसला. यवतमाळच्या हिवरा (संगम) गावात पाऊस सुरू असताना ३२ वर्षीय दीपक चवरे याच्या अंगावर भिंत कोसळून त्याचा मृत्यू झाला. तर गडचिरोली जिल्ह्यात वीज पडून स्वीटी बंडू सोमणकर या शालेय विद्यार्थिनीचा बळी गेला. अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, भंडारासह चंद्रपूर जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडाले. जनावरांच्या गोठ्यांचेही वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
उत्तर महाराष्ट्र : सिन्नरला वीज पडून एक जण ठार नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, देवळा, येवल्याला शनिवारी गारपीट, अवकाळी पावसाने झोडपले. निफाडमधील द्राक्षबागांत गारांचा अक्षरश: थर साचला होता. सिन्नरमधील मेंढी येथे वीज पडून शेतात काम करणाऱ्या बाळू जयराम गिते (६०) यांचा मृत्यू झाला. खान्देशातील नंदुरबार, धुळे जिल्ह्यात गारपिटीमुळे गहू, हरभरा, केळी, पपई, मका, हरभरा, ज्वारी, टरबूज, कांद्याचे नुकसान झाले. सातपुडा पर्वतरांगेतील तोरणमाळ परिसरातही गारांचा पाऊस पडला. जळगाव, नगर जिल्ह्यातही अवकाळी तडाखा बसला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.