आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदवीधर निवडणूक:पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी बोराळकरांना विजयी करा; पंकजा मुंडे यांचे बीडच्या पदवीधर मेळाव्यात आवाहन

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आघाडीच्या उमेदवाराचा पराभव सत्ता परिवर्तनाची नांदी ठरेल'

राज्यातील आघाडी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाही. आम्ही जे दिलं होत ते देखील ह्यांनी काढून घेतलं. शेतकरी, बेरोजगार तरूण, आरक्षण सारखे प्रश्न अजूनही सुटले नाहीत, त्यामुळे पदवीधरांच्या प्रश्नांना खरा न्याय मिळवून द्यायचा असेल तर शिरीष बोराळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले आहे. दरम्यान, आघाडी सरकारच्या उमेदवाराला निवडणूकीत पराभूत करा, तीच खरी सत्ता परिवर्तनाची नांदी ठरेल अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप मित्रपक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ रामकृष्ण लाॅन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर मतदारांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. उमेदवार शिरीष बोराळकर, ज्येष्ठ नेते भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, अक्षय मुंदडा, माजी आमदार आदिनाथ नवले, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राजाभाऊ मुंडे, रमेश आडसकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, सविता गोल्हार, प्रवीण घुगे, विजयकुमार पालसिंगनकर, जि.प. सदस्य अशोक लोढा, भारत काळे आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पंकजा म्हणाल्या की, दोन टर्म पुर्वीपर्यंत हा मतदारसंघ भाजपचा होता. २०१४ मध्येच हा मतदारसंघ भाजपला परत घ्यायचा होता. परंतू लोकनेते मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले. ते नाहीत पण त्यांचं स्वप्न पुर्ण करायची उर्मी कायम आहे. आमचा उमेदवार खेळाडू आणि चँपीयन आहे. लोकांना निवडून आणण्यात माझी पीएचडी आहे. इथला मतदार मुंडे साहेबांवर प्रेम करणारा आहे. आमचं ओठात एक आणि पोटात एक असं काम नाही, आम्ही सर्व सामान्य माणसासाठी काम करणारी माणसं आहोत, बोराळकर यांच्या विजयासाठी मेहनत घेऊ असं त्या म्हणाल्या.

आघाडी सरकारला नाकर्ते

मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न असो की अतिवृष्टीची नुकसान भरपाई सर्व सामान्य जनतेच्या समस्या सरकार सोडवू शकले नाही. सर्व सामान्यांशी त्यांना काहीही देणंघेणं नाही अशा शब्दांत पंकजाताई यांनी टीकास्त्र सोडले. सरकारने जाहीर केलेली मदत तुटपूंजी असल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीचा आपसात मेळ नाही. हे पाच वर्ष सरकार राहणार नाही असे सांगून आपल्या तालुक्याची वेसही न ओलांडणारे पालकमंत्री आपल्याला मिळालेत. एकही रूपयाचा निधी ते जिल्हयात आणू शकले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत बोराळकरांना निवडून द्यायचा शुभशकून करून सत्ता परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवा असं आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादीचा उमेदवार पदवीधरांचा नव्हे तर गुत्तेदाराचा

राष्ट्रवादीचा उमेदवार हा पदवीधराचा नसून गुत्तेदाराचा आहे. लोकनेते मुंडे साहेबांना पराभूत करण्याचा त्याने सर्व शक्ती पणाला लावला होती,खूप त्रासही दिला. अशा उमेदवाराला पराभूत करा असं आवाहन उमेदवार शिरीष बोराळकर यांनी केले. हा मुंडे साहेबांचा, पंकजाताईंचा बालेकिल्ला आहे, त्यांच्या विचारावर ही निवडणूक मी लढवत आहे असंही ते म्हणाले.

यावेळी भीमराव धोडे, सुरेश धस, राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, प्रवीण घुगे यांनीही बोराळकर यांना विजयी करण्याचे आवाहन आपल्या भाषणातून केले. कार्यक्रमाचे संचलन ज्ञानेश्वर काशीद यांनी केले तर भगीरथ बियाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हयातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser