आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डावलल्याचा राग:औरंगाबादेत भाजप कार्यालयासमोर पंकजा मुंडे समर्थकांची घाेषणाबाजी, एक आंदोलक गेवराईचा शिवसैनिक

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत भाजपने पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना संधी नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांत संतापाचे वातावरण आहे. यापैकी तीन ते चार समर्थकांनी गुरुवारी उस्मानपुऱ्यातील भाजप कार्यालयासमाेर घाेषणाबाजी केली. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलकांनी केवळ घोषणाबाजी केली, मालमत्तेचे नुकसान केले नाही. मात्र हे तिघेही भाजपचे पदाधिकारी नाहीत, असे स्पष्टीकरण भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिले. दरम्यान, या तिघांपैकी एक सुनील चव्हाण हा गेवराईतील शिवसेनेचा संघटक असल्याचे सांगितले जाते.

२०१९ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे पराभूत झाल्या. त्यानंतर पक्षातून वारंवार डावलले जात असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. पंकजा यांनीही यापूर्वी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र नंतरच्या काळात त्यांना भाजपने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देत मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी दिली. राष्ट्रीय राजकारणात गेल्यामुळे आता त्यांना राज्यात फारसे महत्त्व दिले जात नसल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे.

यापूर्वी झालेल्या राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत भाजपने पंकजांना संधी दिली नाही. जून महिन्यात पुन्हा या दोन्ही निवडणुका होत आहेत, तेव्हाही विधानसभेत पराभूत झालेले राम शिंदे व अनिल बाेंडे यांना उमेदवारी दिली, पण पंकजांना डावलण्यात आले. त्यामुळे समर्थकांत अस्वस्थता आहेे.

पंकजा मुंडे यांचे मात्र माैन
‘पक्षाने संधी दिली तर त्याचे मी सोने करून दाखवेन’ असे सांगणाऱ्या पंकजा मुंडे उमेदवारी नाकारल्यापासून गप्पच आहेत. नगर जिल्ह्यातही त्यांच्या एका समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केला, तरीही त्या शांत का, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे.

डाॅ. भागवत कराडांविरोधात रोष
सुनील चव्हाण (२५), सचिन डोईफोडे(३४ रा. एन-१ सिडको) आणि योगेश प्रल्हाद खाडे (२६ रा. जयभवानीनगर) या तीन समर्थकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याविरोधात घोषणा दिल्या. पंकजाताई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं अशाही घोषणा दिल्या. पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...