आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडेंचे मौन:समर्थक आक्रमक झाल्याबाबत निकटवर्तीय म्हणतात, आंदोलनामागे पंकजांना बदनाम करण्याचे षड‌यंत्र

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्षाने राज्यसभा, विधान परिषदेत डावलल्याची त्यांच्या समर्थकांत भावना आहे. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. नगर जिल्ह्यात एकाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तर बीड- औरंगाबादेत भाजप नेत्यांना राेषाला सामोरे जावे लागले. एवढे हाेऊनही पंकजा मुंडेंनी मात्र अद्याप मौनात असल्याने त्यांची भूमिका स्पष्ट हाेऊ शकली नाही. दुसरीकडे, त्यांचे निकटवर्तीय मात्र अशा घटना म्हणजे पंकजांना बदनाम करण्याचे षड‌्यंत्रच आहे, असा दावा करतात.

पंकजा मुंडेंच्या दसऱ्या मेळाव्याला लाखाे समर्थक जमतात. त्यांच्यावरील अन्यायाची दाद मागण्यासाठी तीन- चारच लोक कसे पुढे येतील? पंकजा नाराज असत्या तर लाखो समर्थक रस्त्यावर उतरले असते. प्रत्येक वेळी अशा प्रकारांना उत्तर देऊन बदनाम झाल्यापेक्षा प्रतिक्रिया न दिलेलेच बरे, अशी भूमिका पंकजांचे निकटवर्तीय सतीश नागरे यांनी ‘दिव्य मराठी’कडे मांडली. पंकजा यांनी डॉ. कराड मंत्री झाल्याचे स्वागतच केले आहे. मग त्यांंचे खरे समर्थक कराडांवर राेष का व्यक्त करतील? असा सवाल नागरेंनी केला.

दरेकरांवरील राग वेगळा

विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर बीडमध्ये माजी आमदार विनायक मेटे यांच्या कार्यक्रमासाठी आले हाेते. मेटे यांनी लोकसभेला खासदार प्रीतम मुंडे यांच्याविराेधात प्रचार करत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला हाेता. त्यांच्या कार्यक्रमात दरेकर येताना दरेकरांनी बीड भाजप जिल्हाध्यक्ष अथवा पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्याशी सल्लामसलत करणे गरजेचे होते. भाजप एकीकडे सामान्य कार्यकर्त्यास बळ देतो आणि येथे पदाधिकारी विचारत घेत नाही, याचा जाब विचारण्यासाठी दरेकरांची गाडी अडवण्यात आली. हा उमेदवारी नाकारल्याचा राग नव्हता, असे नागरे म्हणाले.

घोषणा देणारे पंकजा मुंडेंचे समर्थक नाहीत : डॉ. कराड
रविवारी (१२ जून) रात्री आपल्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करणारे भाजप कार्यकर्ते किंवा पंकजा मुंडे समर्थक नव्हतेच, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ‘दिव्य मराठी’कडे दिले. सचिन डोईफोडे आणि योगेश खाडे हे दोघे बाळासाहेब सानप यांच्या भगवान महासंघाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा पंकजा मुंडेंशी काहीएक संबंध नाही. कुणीतरी ठरवून षड‌्यंत्राचा भाग म्हणून असे प्रकार करीत आहेत. आधी भाजपच्या, मग माझ्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली जाते. मद्यप्राशन करून आलेले कार्यकर्ते पंकजा समर्थक असूच शकत नाहीत. पोलिस प्रशासन त्यांची चौकशी करत आहेत, असेही डाॅ. कराड यांनी स्पष्ट केले.

बीडमध्ये दहा जणांवर, तर औरंगाबादेत दोघांवर गुन्हे

विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची गाडी अडवल्याप्रकरणी बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थक १० कार्यकर्त्यांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. १२ जून राेजी ही घटना घडली हाेती. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या बीड येथील पुरस्कार वितरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दरेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मेटे यांच्या घरी चहापान करून ते औरंगाबादकडे जात असताना मुक्ता लॉन्स परिसरात त्यांचा ताफा मुंडे समर्थकांनी अडवत घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी पोलिस कर्मचारी अभिजित सानप यांच्या तक्रारीवरून अजय सवाई, दीपक थोरात, डाॅ. लक्ष्मण जाधव, दत्ता परळकर, विलास बामने, ऋषिकेश फुंदे, संग्राम बांगर, अनिल चांदणे, अमोल वडतिले, उद्धव वारे व अन्य दोन जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चाेप देणाऱ्यांवर कराड समर्थकांवरही गुन्हा
औरंगाबादेत रविवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर गदाराेळ केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी सचिन प्रल्हाद डोईफोडे आणि योगेश खाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या उस्मानपुरा भागातील कार्यालयावर डोईफोडेने दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला होता. दरम्यान, कराड यांच्या ५ ते ८ समर्थकांनी डाेईफाेडेला मारहाण केली हाेती, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र त्यांची नावे एफआयआरमध्ये नाहीत.

बातम्या आणखी आहेत...