आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे समर्थकाची कराडांच्या कार्यालयावर चाल:कराड समर्थकांची मारहाण; विधान परिषदेचे तिकीट कापल्याने नाराजीचे पडसाद

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांची असून यावरुनच मोठी नाराजी पसरली आहे. याचे राज्यात आज पडसाद पाहायला मिळाले, औरंगाबादेतही पंकजा मुंडे समर्थक केंद्रीय अर्थराज्य मंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या कार्यालयावर चालून गेला. हे समजताच कराड समर्थकही तेथे पोहचले आणि त्यांनी त्या समर्थकाला मारहाण केली. याचदरम्यान पोलिसही पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. हा प्रकार आज सायंकाळी घडला.

पंकजा मुंडे समर्थक ताब्यात

पोलिसांनी घटनास्थळी पोहचत कराड यांच्या कार्यालयावर चाल करुन जाणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकाला ताब्यात घेतले आहे. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत डावलल्यामुळेच हा समर्थक संतप्त झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पोलिस पोहचल्यानंतर त्यांनी पंकजा समर्थक कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. याआधीही या नाराज समर्थकाने औरंगाबादेतील भाजप कार्यालय गाठून तेथे निषेध नोंदवला होता.

म्हणून कार्यकर्त्यांत रोष

राज्यसभा आणि विधानपरिषद दोन्ही निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. माझे काही मागणे नाही, पण संधी मिळाली तर सोने करून, असे जाहीर वक्तव्य काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी केले होते. विधानसभेत परळी येथून पराभव झाल्यापासून राज्यातील राजकारणातून त्यांना बाजूला करण्यात येत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. यामुळेच यावेळी देखील विधानपरिषदेला पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारण्यात आल्याने मुंडे समर्थकांमध्ये भाजप नेतृवाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपूर्वीही असाच प्रकार

दोन दिवसांपूर्वीच दुपारी औरंगाबाद शहर भाजपच्या कार्यालयावर तीन पंकजा मुंडे समर्थकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे तुम आगे बढो, पंकजा यांच्यावर अन्याय होतोय अशी घोषणाबाजी करत तिघांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतले होते अशी माहितीच पोलिस सूत्रांनी दिली.

पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न - केनेकर

भागवत कराड यांच्या कार्यालयावर चालून गेलेली व्यक्ती मानसिक विकृतीने पछाडलेली आहे. ती पंकजा मुंडेंची समर्थक नाही. याच व्यक्तींनी भाजप कार्यालयावर याआधीही हल्ल्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात कुणाचा तरी हात असून पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे भाजप शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...