आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पंकजाताईच माझ्या नेत्या, त्यांच्या भेटीने मन मोकळे झाले!; केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या भावना

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. भागवत कराड यांचा नवी दिल्लीत सत्कार करताना पंकजा मुंडे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात दिवंगत भाजप नेते गाेपीनाथ मुंडे यांच्या कन्या व बीडच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांचे नाव मागे पडून एेनवेळी औरंगाबादचे राज्यसभा सदस्य डाॅ. भागवत कराड यांची वर्णी लागली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, मुंडे समर्थकांनी मात्र राेष व्यक्त केला. पक्षश्रेष्ठींनी पंकजा व प्रीतम यांना डावलल्याची भावना मुंडे समर्थकांमध्ये निर्माण झाली. खरे तर डाॅ. कराड हेही मुंडे समर्थकच, मात्र त्यांच्याविराेधातही प्रतिक्रिया व्यक्त हाेऊ लागल्या.

या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या दाैऱ्यावर असलेल्या पंकजा यांनी साेमवारी डाॅ. कराड यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले अन‌् डॉ. कराडांचा ताण हलका झाला. ‘पंकजाताई दिल्लीत बैठकीसाठी आल्या हाेत्या. मी त्यांची भेट घेतली, त्यांनी अभिनंदन केले अन‌् मन माेकळे झाले. आज मुंडे साहेबांची आवर्जुन आठवण झाली. मुंडे साहेब माझे नेते हाेते, त्यांच्यामुळेच मी मंत्री झालाे. आज ताई माझ्या नेत्या आहेत. त्यांनीही साहेबांप्रमाणे मला शुभेच्छा दिल्या,’ अशा भावना

डाॅ. कराड यांनी साेशल मीडियावरून व्यक्त केल्या.
मंत्रिमंडळात प्रीतम यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा हाेती. मात्र स्वत: पंकजा यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या चर्चेचे खंडन केले असले तरी डाॅ. प्रीतम या मंत्रिपदासाठी याेग्य असल्याचे सांंगण्यास त्या विसरल्या नाहीत. दुसरीकडे, वंजारी समाजातील एखादा व्यक्ती माेठा हाेत असेल तर त्याच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे असल्याचा सांगून त्यांनी डाॅ. कराड यांच्यावर आपला काेणताही राग नसल्याचे सांगितले हाेते. उलट मुंडेंच्या कुटुंबातीलच व्यक्ती माेठा हाेत असल्याचा आपल्याला आनंद हाेत असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या हाेत्या.

उलटसुलट चर्चेला पूर्णविराम
भाजपच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीसाठी पंकजा मुंडे रविवारी दिल्लीत गेल्या हाेत्या. पण दिवसभरात त्यांनी डाॅ. कराड यांची भेट न घेतल्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र माेदी व पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासाेबतची बैठक उशिरापर्यंत चालल्यामुळे पंकजांची रविवारी भेट हाेऊ शकली नाही. साेमवारी त्यांनी आवर्जून भेट घेतली, असे डाॅ. कराड यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...