आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:शर्थीच्या प्रयत्नाने परभणी, चंद्रपूर कोरोनामुक्त; परभणीला 2.5 लाख कुटुंबांचा सर्व्हे, 37 हजार क्वॉरंटाइन

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • चंद्रपुरात 21 हजार लोक क्वॉरंटाइन

देशाप्रमाणे महाराष्ट्रातही सर्वच शहरे, जिल्ह्यांत काेराेनाचा प्रसार झपाट्याने वाढत अाहे. मात्र, महाराष्ट्रातील परभणी, चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यांतील प्रशासकीय ‘वाॅरियर्स’नी अद्याप काेराेनाचा शिरकाव हाेऊ दिलेला नाही. घराेघरी कुटुंबीयांचे सर्वेक्षण, मुंबई-पुण्यातून अालेल्या लाेकांना सक्तीचे क्वॉरंटाइन, साेशल डिस्टन्सिंग व लाॅकडाऊन सक्तीने पाळल्यामुळे अाजवर हे शक्य झाले, अशा प्रतिक्रिया या तिन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले, जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ३६७ कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये ७०१ कुटुंबांना श्वसनविकाराची लक्षणे आढळली आहेत, तर ३७,५४२ लोक मोठ्या शहरांतून आले आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबादचा समावेश आहे. या सर्वांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे, तर १४ परदेशी लोकांचा समावेश आहे. १ लाख ८३ हजार ६५९ जनजागृतीची पत्रके वाटली आहेत.

भाजी मंडई केली बंद 

मुगळीकर यांनी सांगितले की, परभणी जिल्ह्यातले ७०४ सरपंच आणि पोलिस पाटील यांना वैयक्तिक पत्र पाठवून बाहेरच्या व्यक्ती आल्यानंतर कळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजी मार्केट बंद करण्यात अाले. किराणा, भाजीपाला घरपोच देणे सुरू केले. पीबीएन शॉप नावाचे अॅप विकसित केले. याद्वारे लाेकांना २४ तास घरपाेच जीवनावश्यक वस्तू मिळतात. भाजीपाला पाठवण्यासाठी शेतकी संस्था पुढे आली. त्यांना व्हॉट्सअॅप करून भाजीपाला पाठवला जातो. गर्दीच्या ठिकाणचे सेलू, पाथरी, परभणी, गंगाखेडचे भाजी मार्केट शिफ्ट केले. परभणी विद्यापीठाच्या बाजूचे भाजी मार्केट बंद करून सोसायटीत जाऊन भाजी विक्रीच्या सूचना केल्या. सकाळी केवळ ७ ते ११ या वेळेत लोकांना भाजीपाला, किराणा आणण्यासाठी सवलत दिली. त्यासाठीही घरातल्या एकाच व्यक्तीला बाहेर पडण्याची मुभा दिली आहे तसेच एनजीओच्या माध्यमातून गहू, तांदूळ, तेल, साखर अादी १३ वस्तूंच्या किट बारा हजार लोकापर्यंत पोहोचवल्या आहेत. धार्मिक स्थळे बंद केली.

चंद्रपुरात ६ लाख लोकांना केले फोन

जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी सांगितले की, चंद्रपूरमध्ये दररोज मुंबई आणि पुणे येथून चार रेल्वे येत होत्या. त्यामुळे आलेल्या प्रत्येकाला होम क्वॉरंटाइन केले. अशा २१ हजार लाेकांचा डाटा आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतला, त्यांना हाेम क्वॉरंटाइन केले. दिवसातून आरोग्य आणि पोलिस विभागाच्या माध्यमातून फाेनकॉल करून या लाेकांची तपासणी करण्यात येते. बीएसएनल, व्होडाफोन, आयडिया, जिओच्या माध्यमातून सहा लाख लोकांना फोन करून कोणती समस्या आल्यानंतर कोणाला फोन करायचा याचे नंबर पाेहोचवत जनजागृती केली. जिल्ह्यातील १५ नगरपालिकांमधील भाजी मार्केटचे स्थलांतर केले. सीमा पूर्णपणे बंद केल्या, २२ ठिकाणी चेकपोस्ट लावल्या आहेत.

गडचिराेलीत १६ हजार होम क्वॉरंटाइन

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंघला यांनी सांगितले की, लॉकडाऊन कडकपणे पाळले जात आहे. आतापर्यंत १६,५०० जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले, तर १६ हजार जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहेत. ज्यांना होम क्वॉरंटाइन केले त्यांच्या घरावर पोस्टर स्टिकर चिकटवले आहेत. आतापर्यंत घेतलेले ४० स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. शहराच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...