आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाई दरमहा 18 हजार; श्वानांवर 6 हजारांचा खर्च:परभणीतील युवकाची भूतदया, भटक्या श्वानांच्या स्वयंपाकासाठी एका महिलेलाही दिली नोकरी

गणेश लोखंडे | परभणी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दररोज येता-जाता रस्त्यावर असंख्य भटके श्वाने दिसतात. यातील अनेक जखमी तसेच भुकेने व्याकूळ होत फिरत असतात. बहुतांश जण केवळ हळहळ व्यक्त करून पुढे निघून जातात. परंतु परभणी शहरातील एक २२ वर्षीय युवकाने मात्र भटक्या श्वानांची जबाबदारी घेतली आहे. मागील १० वर्षांपासून तो श्वानांसाठी अविरतपणे काम करत आहे. सुरुवातीला कुटुंबाने मदत केली. पण नंतर व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या रजत विठ्ठलसिंह परिहार हा स्वत:च्या दरमहा १८ हजारांच्या कमाईतील ५ ते ६ हजार रुपये या उपक्रमावर खर्च करणे सुरू केले. विशेष म्हणजे श्वानांना वेळेवर खायला मिळावे म्हणून स्वयंपाकासाठी त्याने एका महिलेला नोकरीही दिली आहे.

रजतचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो परभणीतील सत्कार कॉलनीत राहतो. त्याला बालपणापासूनच श्वानांप्रती जिव्हाळा आहे. त्याच्या घरी सध्या १२ श्वान आहेत. शिवाय घराच्या परिसरातील इतर भटक्या १० ते १५ श्वानांचे संगोपन तो करतो आहे. मागील १० वर्षांपासून त्याचा हा उपक्रम सुरू आहे. यात त्याचे आई, वडील, बहीणही मदत करतात. स्वयंपाकासाठी नोकरी दिलेली महिला दररोज श्वानांसाठी दोन वेळच्या सुमारे ६० भाकरी तसेच पोळ्या करते. तर रजत रोज सकाळी सकाळी १० ते ११ आणि संध्याकाळी ६ ते ७ किंवा जसे शक्य होईल तसे दुचाकीवर पोळ्यांची किंवा भाकरीची पिशवी घेऊन सर्व भटक्या श्वानांना स्वतः फिरून भाकरी खायला देतो.

तसेच श्वानही त्याची यायची वेळ झाली की तो ज्याठिकाणी त्यांना रोज खायला देतो तेथे त्याची प्रतीक्षा करतात. शिवाय एखादा श्वान आजारी असेल, एखाद्याचा अपघात झाला तर त्याचे औषधोपचारही स्वतःच्या खर्चाने करतो. एवढेच नाही तर रात्री, अपरात्री एखद्या श्वानांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली तर तो धावून जात त्याला मदत करतो. विशेष म्हणजे, लॉकडाऊनमध्येही त्याचा हा उपक्रम अविरतपणे सुरूच होता. या काळात काही संस्था प्राणिप्रेमींनी मदत केली.

बालपणापासूनच श्वानांशी माझे भावनिक नाते

मुक्या प्राण्यांची आपण माणूस म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. या भटक्या श्वानांशी माझे भावनिक नाते निर्माण झाले आहे. चांगल्या जातीचे-देखणे श्वान अनेक जण पाळतात, पण दरात आलेल्या श्वानांकडे कुणी फारसे लक्ष देत नाही. पण आपण त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. - रजत विठ्ठलसिंह परिहार, प्राणिमित्र, परभणी.

बातम्या आणखी आहेत...