आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळीज हळहळलं:रखरखत्या उन्हात सहा महिन्याच्या मुलीला सोडलं, 'ती'च्या आकांताने मन गहिवरलं, निर्दयी पालकांचं पलायन

कन्नड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा महिन्याच्या चिमुकलीला रखरखत्या उन्हात सोडून पालकांनी पलायन केले, 'ती'च्या रडण्याचा आवाज ऐकून लोक जमा झाले, तिची सुश्रुशाही केली. त्यातील एकाने तीची जबाबदारी घेण्याचीही तयारी दाखविली. जन्मदाते सोडून गेले असताना या मुलीच्या मदतीसाठी माणुसकी धावली. कन्नड तालुक्यातील शिरसगाव - रेल तांडा येथील ही घटना गुरुवारी उघडकीस आली.

शिरसगाव रेल तांडा गावच्या या रस्त्यावरील स्वामी गोपालनंदगिरी महाराज यांच्या गुरुकुल साधक आश्रमाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या झुडूपात सहा महिन्याच्या चिमुकल्या मुलीला सोडून निर्दयी आई-वडील पसार झाले.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरसगाव येथील नेहरू महेर यांची मुले शाळा सुटल्यानंतर गावातून मळ्यातील घरी जात होती. त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. परंतु आसपास कोणी दिसत नसल्याने त्यांनी वडील नेहरू यांना आवाज देऊन बोलावून घेतले.

नेहरू महेर आल्यानंतर ते चिमुकल्या बाळाच्या रडण्याच्या दिशेने गेले. त्यांना एका झाडाच्या झुडुपात सहा महिण्याची चिमुकल रखरखत्या उन्हाच्या झळा सोसत जीवाचा आक्रांत करत मोठमोठ्याने रडताना दिसली. त्यांनी त्या सहा महिण्याच्या चिमुकलीला त्या झुडुपातुन बाहेर काढले. त्या चिमुकलीला थोड, पाणी दुध पाजुन शांत केले. व नंतर कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे बीट जमादार गणेश जैन यांच्याशी संपर्क साधुन सदर घटनेची माहिती दिली.

पोलिस निरीक्षक तातेराव भालेराव प्रदीप भिवसने, बिट जमादार गणेश जैन यांंनी घटनास्थळी धाव घेत सदरिल घटनेचा पंचनामा केला. सागर सिंग राजपूत, बाबासाहेब धनुरे, विजय चौधरी यांनी त्या चिमुकलीला सरकारी रुग्णालयात दाखल करुन तीच्या आरोग्याची तपासणी केली असता चिमुकली शारीरिक दुष्ट्रा अतिशय सुदृढ असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.

कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव यांच्या उपस्थितीत घटनास्थळी येऊन पाहणी करत व सदरील घटनेचा रितसर पंचनामा करून बिट जमादार गणेश जैन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक तात्याराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गणेश जैन हे करत आहे.

चिमुकलीला घेणार दत्तक

शिरजगाव येथील रस्त्याच्या कडेला झुडुपात बेवारस अवस्थेत सापडलेल्या सहा महिण्याच्या त्या चिमुकलीला रेल येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण गायके दत्तक घेणार असुन त्या संदर्भातील सायंकाळी त्यांनी पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव व जिल्हाधिकारी यांच्यांशी पत्र व्यवहार देखील केला आहे. परंतु दोन-तीन दिवस पोलीस अधिकारी त्या चिमुकलीच्या आई-वडिलांचा तपास करणार आहेत.

जर दुदैवाने त्या चिमुकलीच्या आई-वडीलांचा तपास लांगलाच नाही तर मी आई-वडील म्हणून त्या चिमुकलीला दत्तक घेण्यास कधीपण तयार असल्याचे अरुण गायके यांनी 'दिव्य मराठी' शी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...