आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मुलगी असूनही पालकांनी मला प्रोत्साहित केल्यामुळेच १६ सुवर्णपदके मिळवण्याचा मान मी मिळवू शकले. प्रत्येक पालकाने मुलांप्रमाणेच मुलींनाही उच्च व आपल्या आवडीचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, म्हणजे त्या नक्कीच यशस्वी होऊ शकतील,’ असे मत कर्नाटकची अभियंता विद्यार्थिनी बुशरा मतीन हिने व्यक्त केले. औरंगाबादमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ती बोलत होती. कर्नाटकातील रायचूरच्या ‘एसएलएन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ची २२ वर्षीय विद्यार्थिनी बुशरा १६ सुवर्णपदके प्राप्त करणारी विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाची पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. यापूर्वी १३ सुवर्णपदके एकाने पटकावण्याचा विक्रम या विद्यापीठात झाला होता. औरंगाबादच्या ‘वहिदाते ए इस्लामी’ संघटनेच्या वतीने रविवारी (७ ऑगस्ट) दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात मार्गदर्शन करण्यासाठी बुशरा मतीन हिला आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमापूर्वी तिने पत्रकारांशी संवाद साधून विविध प्रश्नांची उत्तरे दिली. या वेळी वहिदत ए इस्लामीचे मुंतजिबुद्दीन यांची उपस्थिती होती. रविवारी सकाळी १० वाजता कटकट गेट येथील इम्पेरियल लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार असून, बुशरा त्यात मार्गदर्शन करणार आहे.
मला डॉक्टर व्हायचे होते...
बुशरा म्हणाली, ‘मला डॉक्टर व्हायचे होते, माझ्या पालकांचीही तशी अपेक्षा होती. परंतु ११ वी, १२वीत माझी गणितात रुची वाढली. मग मी अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचे ठरवले. पालकांनी माझ्या या निर्णयाचे स्वागत करून मला आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी दिली. मला वेळोवेळी प्रोत्साहनही दिले. त्यामुळेच मी एवढे मोठे यश संपादित करू शकले. प्रत्येक पालकाने अशीच मानसिकता ठेवून मुलींना प्रोत्साहन दिले तरच आपल्या देशाची वेगळी ओळख निर्माण होईल,’ असे ती म्हणाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.