आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:राज्यातील ऑनलाइन शिक्षण बंद होण्यासाठी पालकांनी जनआंदोलन उभारावे : मुनिश्री अक्षय सागर महाराज

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

मानवाचे कान, नाक, डोळे हे अवयव महत्त्वाचे आहेत. मात्र सध्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे डोळे व कान आतापासूनच निकामी होत असतील तर भविष्यातील पिढी सदृढ राहणार नाही. त्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला विरोध करून पालकांनी जन आंदोलन उभारावे असे मत मुनिश्री अक्षय सागर महाराज यांनी शुक्रवारी ता. येथे व्यक्त केले.

येथील महावीर भवन मध्ये पत्रकारांशी बोलताना मुनिश्री अक्षय सागर महाराज म्हणाले की, पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये व आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. सध्या कोरोना मुळे शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाऊ लागले आहे. मात्र ग्रामीण भागातून ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलची रेंज नाही, मोबाईल घेण्यासाठी पालकांकडे पैसे नाहीत. एवढ्या वरही मुलांना मोबाईल दिल्यानंतर मुले किती वेळ ऑनलाईन शिक्षण घेतात व किती वेळ ऑनलाइन गेम खेळतात हे तपासणे गरजेचे आहे.

राज्यात शासनाकडून शंभर टक्के विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप झाली. गणवेशाचे पैसे वाटप झाले आहेत. शासकीय खर्च सुरू आहे पण शिक्षण बंद आहे. खर्च शंभरटक्के आणि शिक्षण शुन्य टक्के अशी आजची स्थिती झाली आहे. शासनाकडून ऑनलाईन शिक्षण दिले जात असले तरी केवळ १५ ते २० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असून उर्वरित विद्यार्थी मात्र शिक्षणापासून वंचित राहत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर टीका करताना ते म्हणाले की, मानवाच्या पाच इंद्रियांमध्ये डोळे कान नाक हे महत्त्वाचे इंद्रिय आहेत. मात्र ऑनलाइन शिक्षणामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे डोळे व कान खराब होऊ लागले आहेत. लहान वयातच डोळे व कान खराब होत असतील तर भविष्यातील ही पिढी सदृढ राहणार नाही. त्यासाठी पालकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद करण्याची मागणी करून जनआंदोलन उभारावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

यासोबतच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना प्रत्येक गावात जाऊन शिकवले पाहिजे. काही ठिकाणी शिक्षक गावात जाऊन शिक्षण देत आहेत. त्यातूनच ऑनलाईन शिक्षण अपयशी ठरल्याचे सिद्ध होऊ लागले आहे. ऑनलाइन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष शिक्षणाचा प्रभाव जास्त पडत असून याचा पालकांनी विचार करणे गरजेचे असल्याचे मतही मुनिश्री अक्षयसागर महाराज यांनी व्यक्त केले.