आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:महाराष्ट्रातील उद्याने अनलॉक, मात्र पैठणचे उद्यान दुरावस्थमुळे राहणार कुलूपबंदच!

रमेश शेळके | पैठण2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्यानातील संत ज्ञानेश्वर आणि भावंडांच्या मूर्ती झाकण्यात आल्या, परंतु कापड फाटून त्या पुन्हा उघड्या पडल्या. छाया : रुचिर भगत - Divya Marathi
उद्यानातील संत ज्ञानेश्वर आणि भावंडांच्या मूर्ती झाकण्यात आल्या, परंतु कापड फाटून त्या पुन्हा उघड्या पडल्या. छाया : रुचिर भगत
  • 310 एकरवारील उद्यानात चरताहेत गुरे, खेळणी मोडकळीस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशातील उद्याने बंद होती. मात्र आता सर्व उद्याने उघडली असली तरी पैठण मधील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान मात्र तेथील दुरवस्थमुळे उघडले गेलेच नाही. महाराष्ट्रात ख्याती असलेले हे उद्यान तसेही आता नावालाच राहिले आहे. ३१० एकरांवरील या उद्यानात सध्या गुरे चरत आहेत. बकाल अवस्थेमुळे पर्यटकांनी आधीच पाठ फिरवली असतानाच कोरोनामुळे हे उद्यान ७ महिन्यांपासून बंदच आहे. ते सुरू करण्यासंदर्भात महसूल विभागाने परवानगी दिलेली नाही. उद्यानातील कारंजांसह इतर खेळणीही बंदच आहेत.

उद्यानाच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहेच. शिवाय ३१० एकरांवरील हे उद्यान जनावरे चारण्याचे ठिकाण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी ७० लाख रुपये खर्च करून भिंत बांधण्यात आली. मात्र बाकी ठिकाणी तारेचे कुंपण नसल्याने जनावरे दिवसभर उद्यानात चरत असतात. ७० लाखांच्या निधीतून उद्यानाला सर्व बाजूंनी तारेचे कुंपण करणे गरजेचे होते. मात्र समोरची एक भिंत उभारून जनावरांसाठी देखणे कुरण उभारण्याचे धोरणच प्रशासनाने राबवले आहे.

संगीत कारंजांसह संगीतच लोपले :

उद्यानामधील एकमेव आकर्षण असलेले संगीत कारंजे देखील आता बंद पडले आहेत. यासह इतर कारंजेही सुरू करण्याची गरज आहे. सध्या उद्यानातील कोणतेच कारंजे सुरू करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीय. उद्यान जास्तीचे पर्यटक आले पाहिजे, यासाठी प्रशासन पुढाकार घेताना दिसत नाही. उद्यान फक्त मॉर्निंग वॉकपुरतेच मर्यादित राहिले आहे. आता कोरोनानंतर पर्यटकांची संख्या वाढू शकली असती. मात्र कोरोनानंतरही उद्यानाची दुरुस्ती झाली नसल्याने पर्यटकांची संख्या वाढणे अशक्य आहे. मात्र, उद्यानात जाऊन चरणाऱ्या जनावरांची संख्या नक्कीच वाढली आहे. राज्यातील प्रमुख पर्यटन केंद्रांमध्ये या उद्यानाचा समावेश होतो. मात्र पर्यटक आकर्षित होतील असे धोरण मागील दहा वर्षात पाटबंधारे विभागाने विभागाने घेतले नाही. उद्यानाच्या खासगीकरणानंतर तर पुणे येथील राजू सातव यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. मात्र शासनाचा कर न भरताच त्यांनी पळ काढला.

शंकरराव चव्हाणांनी रोवली होती उद्यानाची मुहूर्तमेढ

आता शासनाच्या पाटबंधारे विभागाकडे उद्यानाचा ताबा असल्याने या विभागासमोर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीच्या उपाययोजना आखाव्या लागतील. सन १९७५ मध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७०० व्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या वेळी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या उद्यानाची मुहूर्तमेढ महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते रोवली गेली होती.

लवकर सुरू होणार नाही

पैठणमधील उद्यान सध्या सुरू होणार नाही. उद्यानात अनेक कामे करणे बाकी आहेत. शिवाय महसूल विभागाची परवानगी मिळवावी लागेल. त्यानंतरच ते पर्यटकांना ते खुले करावे लागेल. -राजेंद्र काळे, कार्यकारी अभियंता

पर्यटक नसल्याने व्यापाऱ्यांना फटका

राज्यातील उद्याने खुले करण्यात आली असली तरी संत ज्ञानेश्वर उद्यान बंदच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. उद्यान सुरू केले तर नव्याने व्यापार वाढले. -राम परदेशी, हाॅटेल चालक

बातम्या आणखी आहेत...