आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सपोर्ट:वाहतूक समस्या जाणून घेण्यात औरंगाबाद उत्तीर्ण ; ‘ट्रान्सपोर्ट फॉर ऑल फेज टू’च्या दुसऱ्या फेरीत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला परवडणारी, सुरक्षित व सोयीस्कर बनवण्यासाठी सुरू केलेल्या ‘ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंज’च्या पहिल्या टप्प्यात औरंगाबादची उत्कृष्ट कामगिरी नोंदवली गेली आहे. त्यामुळे आता हे शहर दुसऱ्या टप्प्यात भाग घेण्यासाठी पात्र ठरले आहे. पहिल्या टप्प्यात शहराने वाहतुकीच्या समस्या विविध घटकांकडून जाणून घेतल्या. आता त्या निवारणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्र शासनाने सोमवारी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या देशभरातील ४६ शहरांची यादी प्रसिद्ध केली, त्यात औरंगाबादचे नाव आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचा एक उपक्रम म्हणून ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंज १५ एप्रिल २०२१ रोजी सुरू झाले. आयटीडीपी संस्थेच्या साहाय्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नागरिकांच्या वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी हा या मोहिमेचा उद्देश आहे. मनपा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीने ट्रान्सपोर्ट फॉर ऑल मोहिमेत त्यांच्या दिलेल्या निकषाप्रमाणे भाग घेतला. संयुक्त राष्ट्राचे शाश्वत विकासाचे लक्ष्य ११.२ नुसार २०३० पर्यंत सर्व नागरिकांना सुरक्षित, परवडणारी व सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणे अपेक्षित आहे. ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंज या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये औरंगाबादने “ट्रान्सपोर्ट फॉर ऑल टास्क फोर्स” स्थापित केले व त्यानंतर सर्वेक्षणाद्वारे नागरिकांच्या वाहतुकीसंबंधी समस्या जाणून घेतल्या. शहराच्या ५ मुख्य समस्या निवडल्या. यात रिक्षावाले, बस ड्रायव्हर व कंडक्टरचेसुद्धा मत नोंदवण्यात आले.

या चॅलेंजचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार करणे औरंगाबाद शहरासाठी महत्त्वाचे आहे. पुढच्या टप्प्यामध्ये नागरिकांना त्यांच्या वाहतुकीसंबंधी प्रश्नांना उत्तर देण्याचे कार्य होईल, असे पांडेय यांनी सांगितले. चॅलेंजसाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीचे अतिरिक्त सीइओ अरुण शिंदे व स्मार्ट सिटी बसचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड, विश्लेषक सागर इंगळे व माध्यम विश्लेषक अर्पिता शरद हे कार्य करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...