आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांवर दीड लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत मोफत उपचार करण्यासाठी अंमलात आणलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्यातील तब्बल ६४१ रुग्णालयांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीने ही माहिती 'दिव्य मराठी'ला दिली. आर्थिक अपहार उघड झालेल्या रुग्णालयाकडून अपहाराची रक्कम वसूल करून त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले जाणार आहेत.
तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने २०१३ मध्ये ही योजना संपूर्ण राज्यात लागू केली. २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेचे नाव बदलून महात्मा फुले जनआरोग्य योजना असे करण्यात आले. या योजनेत आजघडीला सव्वादोन कोटी कुटुंबांची नोंदणी आहे. या वर्षी युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत ९९६ उपचारांकरिता प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंतचे विम्याचे कवच देण्यात आले आहे. या विम्याच्या प्रिमियम राज्य सरकार भरते.
असे आहे योजनेचे स्वरूप
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजनेतील रेशनकार्डधारक, मराठवाड्यातील पांढरे रेशनकार्डधाकरक व शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय आश्रमातील महिला, शासकीय वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडे नोंद असलेले पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार या योजनेत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत आहेत. प्रत्येक आजारासाठी शासनाने ठरवून दिलेले खर्चाचे पॅकेज आहे. किडनी ट्रान्सप्लांटसाठी मात्र अडीच लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
कोरोनाकाळ : सर्वाधिक गैरप्रकार
पहिल्या लाटेत कोरोनाचा या योजनेत समावेश नव्हता. दुसऱ्या लाटेत समावेश केल्यानंतर काही रुग्णालयांनी बोगस क्लेम करण्याचा धडाकाच लावला. रुग्णांना महिती होऊ न देता काही रुग्णालयांनी परस्पर क्लेम केले आणि रुग्णांकडूनही पैसे घेतल्याचे प्रकार घडले. याशिवाय कोरोनाकाळात जे उपचार रुग्णांवर केलेच नाहीत अशा उपचारांचेही रेकॉर्ड तयार करून योजनेतून पैसे उकळल्याचे उघड झाले.
या कारणांमुळे रुग्णालयांना योजनेतून वगळले
या योजनेत संबंधित रुग्णांवरील उपचार बसवल्यावरही रुग्णांकडून ठराविक जादा रक्कम उकळणे.
जेवढे उपचार केले, त्यापेक्षा अधिक उपचारांचे क्लेम दाखल करणे.
एखादा रुग्ण या जनआरोग्य योजनेस पात्र असतानाही योजनेतून उपचार करण्यास नकार देणे.
प्रत्यक्षात रुग्णाचा आजार एक, योजनेत दुसराच आजार दाखवणे.
रुग्णांना अंधारात ठेवून सर्व उपचार योजनेत बसवणे. शिवाय रुग्णांकडून पूर्ण रक्कम घेऊनही योजनेतूनही पैसे लाटणे.
नियोजित वेळेत उपचारांच्या रकमांचे क्लेम दाखल न करणे.
रुग्णांनी तक्रार करावी
योजना तळागाळातील गोरगरिबांसाठी आहे. मात्र, काही रुग्णालये निव्वळ बोगसगिरी करत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना या योजनेतून वगळले आहे. गंभीर गैरव्यवहार असलेल्या रुग्णालयांकडून अपहाराची रक्कम वसूल केली जाईल, गुन्हेही दाखल केले जातील. योजनेत बसवूनही एखादे रुग्णालय अधिक पैसे मागत असेल तर रुग्णांनी तक्रार करावी.' - शिवानंद टाकसाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, मुंबई
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.