आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची चिंता:परवानगी 2 युनिटला; मात्र शहरात 500 आरओ प्लँट; 25 हजार कुटुंबे वर्षात जारसाठी खर्च करतात 18.25 कोटी

संतोष देशमुख | छत्रपती संभाजीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका संपूर्ण शहराला पुरेसे पाणी पुरवण्यात असमर्थ असल्याने नागरिकांना जारचे पाणी घेऊन तहान भागवावी लागते. त्यासाठी शहरात पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करणारे ५००हून अधिक आरओ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) बाटलीबंद पाण्याच्या केवळ दोन युनिटने परवानगी घेतलेली आहे. या आरओ प्लँटमधून घेतलेले पाणी विविध भागांत विकण्यात येते. त्याची शुद्धता कुणीही तपासत नाही. या पाण्यावर प्रक्रिया केली जाते का बोअर, विहिरीतून उपसून ते थेट जारमध्ये भरून विकले जाते, याचीही पडताळणीची कोणतीही व्यवस्था नाही. शहरातील सुमारे २५ हजार कुटुंबे रोज पाण्याचे जार घेतात. एका वर्षासाठी एका कुटुंबाला ७,३०० रुपये खर्च करावे लागतात. शहरातील नागरिक जारच्या पाण्यासाठी दरवर्षी १८ कोटी २५ लाख खर्च करतात.

सातारा-देवळाईतील सुमारे ७० टक्के कुटुंब जारच्या पाण्यावर अवलंबून आहेत. याच ६०हून अधिक आरओ प्लँट आहेत.शहरात गुरुवारी ४१ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. शहरात पुरेसे पाणी मिळत नसलेल्या भागातील नागरिक, दुकानदार, व्यावसायिक, सरकारी कार्यालये, खासगी आस्थापना आदी ठिकाणी पाण्याचे जार विकत घेतात. या जारमधील पाणी प्रक्रिया केलेले आहे की, बोअरवेल, विहिरीतून भरलेले, याची कोणतीही माहिती ग्राहकाला नसते. या पाण्याची शुद्धता कुणीही तपासत नाही. तशी व्यवस्था केलेली नाही. एफडीए व मनपाचे त्यावर कोणतेच नियंत्रण नाही.जारद्वारे रोज साडेसहा लाख लिटर पाण्याचा पुरवठा : सातारा-देवळाई परिसरातील पाच हजार कुटुंबे, जटवाडा, सारा वैभव, सईद कॉलनी, होनाजीनगर, हितोपदेश कॉलनी, सांगळेनगर, राधास्वामी कॉलनी, गायकवाड हाउसिंग सोसायटी, एकतानगर परिसरातील दोन हजार, इटखेडा, हर्सूल, पडेगाव परिसरातील तीन हजार, भवानीनगर, मुकुंदवाडी, भारतनगर परिसरातील एक हजार, गारखेडा परिसर, शिवाजीनगर, कांचनवाडीतील दोन हजार, छावणी, सिडको, हडको व जुने शहर, चिकलठाणा औद्योगिक वसाहती तीन हजारांवर मालमत्ताधारक, कुटुंबे जारच्याच पाण्याने तहान भागवतात. त्याशिवाय विवाह समारंभात जारच्या पाण्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर सरकारी, खासगी कार्यालये, दुकानांतही जारचे पाणी घेतले जाते. या सर्व परिसरातील गल्लीबोळात आरओ प्लँट सुरू झाले आहेत. रोज एक विक्रेता सरासरी ६५ जार विकतो. एका जारमध्ये २० लिटर पाणी असते. शहरातील ५०० प्लँटवरून ३२,५०० जारद्वारे ६ लाख ५० हजार लिटर पाण्याची विक्री केली जाते.

धोरण ठरवणे नितांत गरजेचे

मनपा पाणीपुरवठा विभाग प्रमुख मोहिउद्दीन काझी यांनी सांगितले की, आम्ही पाणी विक्रेत्यांना परवानगी देत नाही. आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी “शहराच्या गल्लीबोळात ५००वर आरओ सेंटरमधून जारद्वारे पाणी विक्री सुरू असून, पाण्याच्या शुद्धतेचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे मॉनिटरिंग होणे नितांत गरजेचे अाहे,’ असे नमूद केले. सध्या तसे होत नसल्याचीही कबुली त्यांनी दिली. त्याबाबत लवकरच नियमावली हवी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एका कुटुंबाचा पाण्याचा वार्षिक खर्च ७ हजारांपेक्षा जास्त

बहुतांश कुटुंबांना रोज एक जार खरेदी करावा लागतो. एका कुटुंबाला पिण्याच्या पाण्याचा जार खरेदी करण्यासाठी रोज २० रुपये मोजावे लागतात. ३६५ दिवसांसाठी त्यांचा खर्च ७,३०० रुपये होतो. थंड पाण्याचा जार घेतल्यास दरवर्षी १०,९५० रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. मनपा वर्षभरासाठी केवळ २,५०० रुपये पाणीपट्टी आकारते. मात्र, अनेक भागात नळ पोहोचलेले नाहीत. नळ आहेत तेथे पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. त्याचबरोबर ६ ते ८ दिवसांनतर नळाला पाणी येते. त्यामुळे अधिकचे पैसे मोजून जारद्वारे पाणी खरेदी केले जातात.

आम्हाला पाणी मिळते, हीच मोठी गोष्ट
बोअरला पाणी नाही. नळाची व्यवस्था नाही. त्यामुळे वॉटर फिल्टर सेंटरमधून आम्हाला पाणी मिळते, हीच मोठी गोष्ट आहे. शुद्धतेबाबत आम्ही कधी विचारले नाही. या परिसरातील ७० टक्के नागरिकांना जारचेच पाणी घ्यावे लागते. - गणेश लांडे, आलोकनगर, सातारा परिसर
आम्ही परवानी देत नाही, पाणी तपासत नाही

‘एफडीए’कडून दोन मॅनिफॅक्चरिंग युनिटने परवानगी घेतलेली आहे. बाटलीबंद पाण्यासाठी परवानगी दिली जाते व त्याची शुद्धता तपासली जाते. आरओ प्लँट, जार िक्रीची परवानगी व तपासणी आमच्याकडे केली जात नाही. - अजित मैत्रे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.

जारच्या पाण्याचे दर

आरओ प्लँटवर २० लिटर साधे पाणी दहा रुपयांत मिळते. घरपोच जारचा दर १५ ते २० रुपये आहे. आरओ प्लँटवर थंड पाणी २० रुपयांत विकले जाते. त्याचबरोबर थंड पाण्याच्या घरपोच जारचा दर ३० रुपये आहे.