आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथ कारखान्यातील 700 कामगारांचा पीएफ थकला:19 डिसेंबरपर्यंत PF, दंड व्याजसह रक्कम मिळावी, आयुक्तांना पत्राद्वारे बेमुदत उपोषणाचा इशारा

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत एकनाथ सहकार संचालित सचिन घायाळ शुगर कारखान्यातील सातशे कामगारांच्या वेतनाबरोबरच आठ कोटींवर पीएफही थकवला आहे. 19 डिसेंबरपर्यंत संपूर्ण पीएफ, दंड व्याजसह रक्कम मिळावी, अन्यथा पीएफ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा सेवानिवृत्त कामगारांनी पीएफ आयुक्तांना एका पत्राद्वारे दिला आहे.

पत्रात म्हटले आहे की, कामगारांच्या वेतनातून दर माह पीएफ कपात करण्यात आलेला आहे. असे असताना २०१३,१४ पासून ते २०१९ पर्यंत पाच वर्षे आणि त्यानंतर २०२० ते २०२२ मधील ३६ महिन्यांपैकी ३३ महिन्यांचा पीएफ भरलेला नाही. सेवानिवत्तीनंतरही आमच्या श्रमाचा मोबदला का दिला जात नाही? याबाबत पीएफ आयुक्तांना निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप त्याचा कोणताही उपयोग झालेला नाही. आर्थिक विवंचनेत असलेले दोन ते तीन कामगार मयत झाले आहेत.

सेवानिवत्ती नंतर आम्ही इच्छा असूनही दुसरे काम करू शकत नाही. कष्टाचा मोबदला वेळेत मिळत नसल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह, मुला मुलींचे शिक्षण, विवाह, आरोग्य आदी खर्च कसा पूर्ण करावा, हा अतिशय गंभीर प्रश्न आमच्या समोर उभा असल्याचे कारभारी कासोदे, दादासाहेब लांभाडे, रमेश काळे, रंगनाथ सोनटक्के, दगडु काळे, गणपत शिंदे, राम धारकर, विश्वनाथ शिंदे, बाळचंद्र बोंबले, भाऊसाहेब बोंबले, भानुदास भुमरे आदींनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असताना संबंधित संचालकांवर नियमाप्रमाणे कारवाई करून कामगारांना न्याय का दिला जात नाही? हा गंभीर अपराध आहे. या प्रकरणाची निष्पक्षपणे सखोल चौकशी करून दोषी संचालकांवर नियमाप्रमाणे कठोर शासन करावे. अशी मागणी देखील सुभाष भालेकर, दामोधर थोरात, परसराम मरकड यांनी केली आहे.

गत तेरा महिन्यांपासून कामगारांच्या पीएफ संदर्भात ७ ए ईपीएफ अॅक्ट अंतर्गत ऑनलाइन चौकशी करण्यात येत आहे. यातून आजवर काहीच साध्य झालेले नाही. निव्वळ टाईमपास सुरु असून असे किती दिवस चालणार आहे? त्यामुळे बिनकामाची चौकशी बंद करून न्याय मिळावा. असे आशाबाई जगधणे व दादासाहेब पाचोडे यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री संदीपान भुमरे व सहकार मंत्री अतुल सावे यांनी पंधरा दिवसांत बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावतो, अशी ग्वाही कामगारांना देऊन उपोषण मागे घ्याला लावले होते. त्याला दोन महिने उलटले आहेत. असे असताना पालकमंत्र्यांनीच कामगारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घडवून या विषयी नुकतीच चर्चा केली आहे. आता तरी संचालकांना कुणी जबाब विचारून न्याय मिळायला हवा, अशी अपेक्षा सर्वच कामगार व्यक्त करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...