आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी प्रथम वर्षाच्या ७५२ जागा अद्यापही रिक्त आहेत. दोन वेळा स्पॉट अॅडमिशनची प्रक्रिया होऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष व परीक्षांचे वेळापत्रक कोलमडू नये, म्हणून आता या प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी गुरूवारी (२२ सप्टेंबर) स्पष्ट केले आहे.
प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद उपकेंद्रातील १० आणि विद्यापीठ परिसरातील ४५ अशा ५५ शैक्षणिक विभागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे. १ सप्टेंबरला विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेची प्रवेश फेरी झाली होती. त्यानंतर ५ सप्टेंबरला वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्य विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखेतील सर्व विषयांसाठी प्रवेश फेरी आयोजित केली होती. त्यानंतरही जवळपास १०८४ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यासाठी १० सप्टेंबर रोजी संबंधित विभागात विद्यार्थ्यांसाठी स्पॉट अॅडमिशनची संधी देण्यात आली होती. या संधीनंतरही प्रथम वर्ष प्रवेशाच्या ८२९ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा १९ सप्टेंबर रोजी स्पॉट अॅडमिशनची मुदत दिली होती.
या वेळी काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र, त्यानंतरही ७५२ जागा अद्यापही रिक्तच आहेत. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ देणे केवळ अशक्यप्राय असल्याचे कुलगुरू डॉ. येवले यांनी म्हटले आहे. परंतु, विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आले तर त्यांना प्रवेश देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.