आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होरपळ थांबवण्यासाठी कुलगुरूंचा निर्णय:पीएचडीची प्रक्रिया ऑनलाइन, 3500 संशोधकांना ‘फ्रेंडशिप गिफ्ट’

औरंगाबाद / डॉ. शेखर मगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित १६० संशोधन केंद्रांत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ‘फ्रेंडशिप डे’ची अनोखी भेट दिली. पीएचडीची सर्व प्रक्रियाच ऑनलाइन करून अनाठायी होरपळ थांबवली आहे. विशेषत: प्रोग्रेस रिपोर्ट, त्याचे शुल्क, प्रत्येक सहा महिन्यांचे शैक्षणिक शुल्कही आता ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. पीएचडी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे विद्यापीठ अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. त्यात कुलगुरू डॉ. येवले यांना यश आले. २०२१ दरम्यान ‘पेट’ उत्तीर्ण अन् ज्यांचे पीएचडी प्रवेश निश्चित आहेत त्यांची प्रक्रिया आता www.bamu.ac.in या संकेतस्थळावरील पीएचडी पोर्टलवरून होईल. या निर्णयाचा तीन हजार पाचशेपेक्षा अधिक संशोधक मित्रांना लाभ होईल.

आधीपासून संशोधन करणाऱ्यांनाही होणार फायदा : २०२१ पूर्वी ‘पेट’ देऊन संशोधन करणाऱ्यांना ऑफलाइनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी त्यांचे लॉगिन आयडी आणि पीआरएन (पर्मनंट रजिस्ट्रेशन नंबर) निर्माण करावेत. त्यासाठी प्रोव्हिजनल लेटरच्या छायाप्रतीवर मोबाइल क्रमांक लिहून ते प्रोव्हिजन लेटर petcell@bamu.ac.in या ई-मेल अायडीवर पोस्ट करावे.

ऑनलाइनचे ३ टप्प्यांचे करावे लागेल पालन
१ ‌पीएचडी पोर्टलवर संशोधकांना आयडीवरून लॉगिन करावे. आधी प्रोग्रेस रिपोर्टचे ७५ रुपये डिजिटल पेमेंटने भरावे. त्यानंतर ऑनलाइन प्रोग्रेस रिपोर्टमध्ये आवश्यक माहिती भरावी.

२ प्रोग्रेस रिपोर्ट जानेवारी ते जून व जुलै ते डिसेंबरचे असे वर्षातून दोनदा द्यावे लागेल. त्या प्रत्येक ६ महिन्यांचे शुल्कही डिजिटल पेमेंटनेच भरणे आहे.

३ दोन्ही शुल्क
आणि ऑनलाइन प्रोग्रेस रिपोर्ट भरल्यावर त्याची प्रिंट घ्यावी. प्रिंटवर पीएचडी मार्गदर्शक, संशोधन केंद्रप्रमुखाची स्वाक्षरी घेऊन प्रोग्रेस रिपोर्ट स्कॅन करून पुन्हा पोर्टलवर अपलोड करावा.

उशीर करणाऱ्यांना २०० रुपये दंड
ऑनलाइनच्या कक्षेत आल्यानंतर पुन्हा ऑफलाइन स्वीकारले जाणार नाहीत. प्रोग्रेस रिपोर्ट सादर करण्यास उशीर झाला तर प्रति महिना २०० रुपये दंड भरावा लागेल, जो आधी ऑफलाइनमध्येही भरावा लागत होता. आम्ही ऑनलाइनच्या सूचना शैक्षणिक विभागांना, संलग्नित संशोधक केंद्रांना दिल्या आहेत. याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल.
-डॉ. गणेश मंझा, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

बातम्या आणखी आहेत...