आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेणी कसरत:छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरील चित्र, रोज हजाराहून अधिक प्रवासी घालतात जीव धोक्यात

ऋषिकेश श्रीखंडे | छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाशांना लोहमार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा म्हणून रेल्वे प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर दोन प्लॅटफाॅर्मदरम्यान पूल उभारले. त्याचबरोबर सरकते जिने आणि लिफ्टचीही सोय करून दिली. त्यासाठी तब्बल १४ कोटी ३० लाख रुपये खर्च केले. मात्र या सोयींकडे पाठ फिरवून प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात.

‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने दुपारी साडेबारा ते दीड या वेळेत पाहणी केली असता एका तासात तब्बल १०० प्रवाशी धोकादायक पद्धतीने लोहमार्ग ओलांडत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर रोज ६५ रेल्वे ये-जा करतात. या रेल्वेंमधून येथून रोज सुमारे २५ हजार प्रवासी प्रवास करतात

प्रवाशांनो सावधान, अन्यथा होईल गुन्हा दाखल : रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर रेल्वेच्या नियमानुसार कलम १४७ नुसार गुन्हा दाखल केला जातो. त्याचबरोबर ५०० रुपये दंड देखील ठोठावला जातो.

४ फलाटांवर ये-जा करण्यासाठी सोय

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर चार फलाट आहेत. या फलाटांवर प्रवाशांना ये-जा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ११ कोटी रुपये खर्चून ३ पूल बांधले. स्टेशनवर ३ सरकते जिने बांधले असून, यासाठी २ कोटी २५ लाख रुपये खर्च केला आहे. त्याचबरोबर ३ लिफ्ट उभारल्या असून, यासाठी १ कोटी ५ लाख रुपये एवढा खर्च केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

४ महिन्यांत २०० प्रवाशांवर कारवाई

रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांचे देखील लक्ष असते. तरीही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात. जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांत २०० प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने नियमानुसार कारवाई केली आहे.‘लिफ्टचे मला कळत नाही’

दुपारी १ वाजून ०८ मिनिटांनी सत्तरीतील एका ज्येष्ठ नागरिकाने लोहमार्ग ओलांडला. त्यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘हे ओझे एवढे मोठे आहे. ते घेऊन मी एवढा गर्मीत पूल कसा चढू?, थकवा येतो. लिफ्टचे मला काहीही कळत नाही. त्यामुळे मी हे ओझे घेऊन रूळ ओलांडला.’लिफ्ट, सरकते जिने असतानाही छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर रोज प्रवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडतात.

नोकरदारही ओलांडतात रूळ

दुपारी एकच्या सुमारास चाळिशीतील नोकरदार प्रवाशाने दोन्ही बाजुंना डोकावून रूळ ओलांडले. त्याच्याकडे मोठी बॅग होती. ती त्यांनी सोबतच्या व्यक्तीकडे दिली होती.त्यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मान खाली घालून बोलण्यास नकार दिला.

‘शॉर्टकटमुळे आलो’

दुपारी १२.४० वाजता १४ ते २० वर्षे वयाच्या दोन मुलांनी फलाट क्रमांक एकवरून रूळ ओलांडला. ‘दिव्य मराठी’ने त्यांना याबाबत विचारले असता, ‘कोण पूल चढ-उतार करेल. लिफ्टमधील गर्दीत कोण घुसेल, म्हणून शॅार्ट-कटने आलो,’ असे सांगून ते निघून गेले.

रेल्वेने केलेला खर्च

  • ३ उड्डाणपूल : ११ कोटी
  • ३ सरकते जिने : २ कोटी २५ लाख
  • ३ लिफ्ट : १ कोटी ५ लाख