आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:पिंपरी शिवारातील खून प्रकरणात नांदेडचे दोघे जण पोलिसांच्या ताब्यात, आणखी काही जणांचा शोध सुरु

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका स्कोडा गाडीमध्ये मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

आखाडा बाळापूर जवळील पिंपरी शिवारातील नांदेडच्या व्यक्तीच्या खून प्रकरणात पोलिसांनी शनिवारी पहाटे नांदेडच्या दोघांना ताब्यात घेतले त्यांची सखोल चौकशी सुरु आहे. तर आणखी काही जणांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. मालमत्ता किंवा अनैतिक संबंध यापैकी एका कारणावरून मयत माणिक राजाराम राजेगोरे (50) यांचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आखाडा बाळापूर जवळील पिंपरी शिवारात एका स्कोडा गाडीमध्ये मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, जमादार संजय मार्के, शेख बाबर यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री साडेआकरा वाजता घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये स्कोडा कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे केस जळालेले होते तर वाहनाचा काही भाग देखील जळाला. त्यामुळे हा खून असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

दरम्यान, पोलिसांनी मयत व्यक्तीच्या भ्रमणध्वनीवरून इतरांशी संपर्क साधला असता सदर मृतदेह माणिक राजाराम राजेगोरे (50) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. सदर व्यक्तीचा मृत्यू 24 तासापुर्वी झाला असावा अशी शक्यता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर मृतदेहाच्या गळ्या भोवती आवळल्याच्या खूना असल्याचे आढळून आले. त्यामुळे मृतदेह आज सकाळी नांदेड येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला शुक्रवारी रात्रीच घटनास्थळी रवाना केले.

गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार विलास सोनवणे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे यांच्या पथकाने नांदेड भागात चौकशी सुरु केली. यामध्ये आज पहाटे पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. या शिवाय या प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक नांदेडकडे रवाना झाले आहे. तर हा खून मालमत्तेच्या वादातून किंवा अनैतिक संबंधातून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मयत माणिक राजेगोरे हे नांदेड येथे मालमत्ता खरेदी विक्रीचा तसेच वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होता. मागील पंधरा वर्षापासून ते नांदेडात राहतात. तर काही दिवसांपुर्वीच त्यांनी भिशीचा व्यवसाय देखील सुरु केला होता. त्यातून आठ दिवसांपुर्वीच त्यांचा इतरांसोबत वाद देखील झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...