आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबी चेंडू टी-20 क्रिकेट स्पर्धा:20 षटकांत 8 बाद 335 धावांचा डोंगर, व्हिजन संघाने एमआयटीला हरवले

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिपेट मैदानावर सुरू असलेल्या गुलाबी चेंडूवरील टी-20 क्रिकेट स्पर्धेत व्हिजन संघाने एमआयटी संघावर 179 धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना व्हिजनने 20 षटकांत 8 बाद 335 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात एमआयटी संघ निर्धारित षटकात 8 बाद 156 धावा करु शकला. शतकवीर अभिजीत भगत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

कर्णधार अभिजीतची शतकी खेळी

नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना व्हिजनच्या अभिजीत भगतने कर्णधाराला साजेशी खेळी केली. सलामीवीर अभिजीतने अवघ्या 39 चेंडूंत 116 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 12 षटकारांचा पाऊस पाडला. भुषण नावंदे 12 धावांवर बाद झाला. अनुभवी अजय काळेने अर्धशतक झळकावले. त्याने 25 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 4 षटकार लगावत 56 धावा काढल्या. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी देखील आपले योगदान दिले. राम राठोडेने 27, अंकुल बोधगिरेने 35, अनिकेत जाधवने 32, धीरज थोरातने 28 धावा जोडल्या. एमआयटीच्या प्रफुल्ल कमलानीने 2 आणि राकेश यादव, सुमित चव्हाण, मित रोहराने प्रत्येकी 1-1 बळी घेतले.

विंन्सेटचे अर्धशतक

प्रत्युत्तरात एमआयटीच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात करुन देवूनही फलंदाजांना आक्रमक खेळता आले नाही. व्हिजनच्या गोलंदाजांनी त्याच्या फलंदाजीवर सुरुवातीपासून मूरड घातली. सलामीवीर शुभम कांबळेने १० चेंडूंत २७ धावा केल्या. विन्सेंट स्वामीने ४२ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार लगावत सर्वाधिक ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यांच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. राकेश यादवने २२, सुमीत चव्हाणने १५ व मित रोहराने १६ धावा केल्या. व्हिजनच्या भुषण नावंदेने ३३ धावा देत ३ फलंदाजांना बाद केले. अजय काळे, अंकुल बोधगिरे, अनिकेत जाधव व अभिजीत भगतने १-१ गडी बाद केले.

भुषण नावंदे.
भुषण नावंदे.
बातम्या आणखी आहेत...