आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावसिंगपुऱ्यातील नागरिक त्रस्त:रस्त्याच्या मध्यभागीच पाइपलाइनसाठी खणलेल्या खड्ड्यांमुळे लोकांची आबाळ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, यासाठी औरंगाबाद खंडपीठ महापालिकेसह जीवन प्राधिकरणास धारेवर धरत असले तरी नागरिकांना वेठीस धरण्याचा सरकारी कारभार सुधारताना दिसत नाही. भावसिंगपुरा येथील नागरिक नेमकी त्याचाच अनुभव घेत आहेत. पाणी तर दूर, पाणीपुरवठ्याच्या नावाखाली घरापर्यंत जाणाऱ्या त्यांच्या रस्त्याचीही भयंकर दुर्दशा झाली आहे. ही अवस्था आहे जीवन प्राधिकरणाने रस्त्याच्या मधोमध पाइपलाइनसाठी खणलेल्या चारीमुळे नागरिकांना होत असलेल्या हालांची.

राज्य शासनाने दिलेल्या ३१७ कोटींपैकी ८० कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू झाली. त्यापैकी पाच रस्ते पूर्ण तयार झाले असून १६ रस्त्यांची काम सुरू आहे. त्यांच्या बाजूच्या फुटपाथवर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम प्राधिकरणाने पाइपलाइन टाकली नसल्याने थांबले आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभाराचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भीमनगर-भावसिंपुरा रस्त्याच्या मधोमध पाइप टाकण्याचा त्यांनी प्रताप केला. याच मुख्य रस्त्यावरील माउली मेडिकलसमोरील वळणाच्या रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून पाइप टाकले. त्यामुळे स्मार्ट सिटीतर्फे तयार करण्यात येणारे रस्ते नेमके केव्हा पूर्ण होतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राधिकरणाच्या ढिसाळ व नियोजनशून्यतेमुळे पाइपलाइनसह रस्त्याचे काम रखडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्य शासनाने शहराच्या रस्त्यांसाठी ३१७ कोटी दिले होते. त्यापैकी ८० कोटी खर्च करून २२ रस्ते तयार करण्यात येत आहेत. त्यात १६ रस्त्यांचे कॅरेज म्हणजे काँक्रिटीकरण केले. परंतु त्याच्या बाजूला फुटपाथ करण्यासाठी पेव्हर ब्लॉक मात्र बसवले नाहीत. विशेष म्हणजे भावसिंगपुरा माउली मेडिकलच्या कॉर्नरवर रस्ता व भावसिंगपुरा अमीन चौक ते ग्लोरिया सिटी या दोन रस्त्यांच्या मधोमध पाइप टाकले आहेत.

२२ रस्त्यांची दुरवस्था रस्त्यांमध्ये देवगिरी बँक एन-८, एसबी कॉलेज, भाग्यनगर, एन ११, ओमकार गॅस बळीराम पाटील रोड, एसबीओए शाळा, भगवतीनगर, नागेश्वरवाडी, पारिजातनगर, समर्थनगर, भोला पान सेंटर, देवगिरी बँक, बजरंग चौक, रिलायन्स पेट्रोल पंप आदी भागातील रस्त्याचे पूर्ण करण्यात आले आहे तर पाइपलाइन टाकत नसल्याने अनेक कामे रखडली आहे.

माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवतो त्या जागेच्या स्थळ पाहणीसाठी कनिष्ठ अभियंता व अधिकाऱ्यांना पाठवून सविस्तर माहिती घेण्यात येईल. तसेच नेमके काय घडले जाणून घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. - गजानन रबडे, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण

सूचनांना केराची टोपली आम्ही जीवन प्राधिकरण प्रशासनाला वारंंवार सूचना देऊनही योग्य प्रकारे काम होत नसल्याने रस्ता करण्यात अडचणी येतात. - इम्रान खान, प्रोजेक्ट मॅनेजर स्मार्ट सिटी

हा तर नागरिकांच्या जिवाशी खेळ, नळाला येते सांडपाणी पाइपलाइनसाठी रस्त्याच्या मधूनच खोदकाम केले. त्यामुळे ड्रेनेजलाइन आणि जुनी पाइपलाइन फुटल्याने अनेकदा सांडपाणीमिश्रित पाणी नळाला येते. रस्त्याची गैरसोय होते आहे ती वेगळीच. - रोहित थोरात, रहिवासी भावसिंगपुरा

या खड्ड्यात रोज लोक पडून जखमी होतात पाइपलाइनसाठी खड्डा खोदून पाइप टाकून निघून गेले. त्यात लोक पडून अपघात होतात. त्यात पाणी साचलेले आहे. डास होतात. रात्री अंदाज येत नसल्याने वाहनधारक तसेच पायी चालणारे पडत असतात. -चंद्रकला शिंदे, रहिवासी भावसिंगपुरा

बातम्या आणखी आहेत...