आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानव्याने घोषणा केलेल्या औरंगाबाद-पुणे ग्रीनफील्ड महामार्गाच्या जमीन संपादनाच्या कामास प्रारंभ झाला आहे. औरंगाबाद-नगर, पुणे जिल्ह्यातून मार्ग जात असल्याने तिन्ही जिल्ह्यांत प्रक्रिया सुरू झाली आहे. शहराजवळील झालर क्षेत्रात ग्रीनफील्ड मार्गासंबंधी माेजणी सुरू केल्याने शेतकरी आणि गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. ग्रीनफील्ड मार्ग असल्याने तो संपूर्ण ग्रीन भागातून जाणार आहे. झालर क्षेत्राचा आराखडा २०१७ मध्ये अंतिम केलेला आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये डीपी प्लॅन तयार आहे. डीपी रस्त्यांचे आरक्षण निश्चित केलेले असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अशा स्वरूपात कारवाई केली जात आहे. सिडको प्रशासनाकडे यासंबंधी कुठलीच माहिती नसल्याचे उत्तर शेतकऱ्यांना मिळत आहे.
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिलमध्ये औरंगाबाद-पुणे या ग्रीनफील्ड मार्गाची घोषणा केली होती. औरंगाबाद झालर क्षेत्र विकास समितीतर्फे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना निवेदन दिलेे. औरंगाबाद-पुणे ग्रीनफील्ड रस्त्याची अधिसूचना नोव्हेंबरमध्ये जारी केली. हा रस्ता सुंदरवाडी, झाल्टा, हिरापूर आदी गावांच्या शिवारातून नेण्यात येऊ नये, आडगाव येथून सरळ शेंद्रा औद्योगिक वसाहतीला करमाड येथे जोडावा, अशा मागण्या केल्या आहेत.
सहानुभूतीने विचार करू : मंत्री गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाळूज ते चिकलठाणा व पुढे केंब्रिज स्कूल इलेव्हेटेड मेट्रोसाठी सहानुभूतीने विचार करणार असल्याचे म्हटले असून डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. समृद्धी मार्ग जोडण्यासाठी औरंगाबाद-नांदेड रेल्वेलाइन, जालना रोड, इलेव्हेटेड मेट्रोलाइन आदींना ओलांडून हा रस्ता करावा लागणार आहे. त्यामुळे असा रस्ता शक्य होणार नाही. सिडकोने झालरक्षेत्राचा आराखडा २०१७ मध्ये अंतिम केला आहे. वगळलेल्या भागातील काही आरक्षणावर विचार सुरू आहे. अनेकांनी मालमत्ता विकसित केल्या आहेत. डीपी रोडचे आरक्षण ठेवले आहे. अनेकांच्या रेखांकनांना मंजुरी दिली असून प्लॉटिंग, गृहप्रकल्प आकारास आले.
८ ते १० किमीमध्ये इंटरचेंज परिसरात समृद्धीसाठी ८ ते १० किमी अंतरात तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटरचेंज सावंगी येथे असून दुसरा एमआयडीसी शेंद्रा येथे ठेवला आहे. ग्रीनफील्डसाठी आता हिरापूर येथे इंटरचेंजच्या हालचाली सुरू आहेत. जालना रस्त्यासाठी इंटरचेंज ठेवावा लागेल. झाल्टा टी पॉइंट ते धुळे-सोलापूर आणि नंतर पुढे ग्रीनफील्डसाठी इंटरचेंज ठेवावा लागणार आहे. त्यामुळे कितीतरी जमीन त्यासाठी लागणार असल्याने येथील नागरिक आणि गुंतवणूकदारांना पुन्हा बेदखल व्हावे लागणार आहे, असे झालर क्षेत्र समितीचे विवेक रहाटकर यांनी स्पष्ट केले. सिडको कार्यालयाशी संपर्क साधला असता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडून कुठलीच विचारणा झाली नसल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.