आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताबा मिळेना:13 एकर जागेवर भव्य शासकीय कार्यालये बांधण्याची योजना अजूनही चर्चेतच अडकली; संतप्त महिलांमुळे पथक माघारी

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

“३५ घरांचा पाणीपुरवठा बंद केला. १८ घरांची वीज तोडली. शिवाय दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे,’ असे सांगत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गेल्या आठ दिवसांत लेबर कॉलनी पाडापाडीसाठी वातावरणनिर्मिती केली. गेले दोन दिवस अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र राबवत गुरुवारी (१० मार्च) दुपारी बुलडोझर घेऊन पोहोचले. पण तेथील रहिवासी, विशेषत: महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी स्वत:ला बुलडोझरसमोर झोकून दिले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अक्षरश: हात जोडले. महिलांच्या प्रक्षोभापुढे ४५ मिनिटांत पथकाला माघारी फिरावे लागले. मात्र, पुरेसा पोलिस बंदोबस्त घेऊन पुन्हा मोहीम होणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोक्याच्या जागेवर शासकीय कर्मचाऱ्यांची मोठी वसाहत आहे. मात्र, त्यातील अनेक जण सेवानिवृत्त झाल्यावरही तेथेच राहिले. काही जणांनी तर घरे भाड्याने दिली. त्यामुळे तेथील इमारती पाडून शासकीय कार्यालये बांधण्यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतला. चार महिन्यांपूर्वी या कामाला वेगही दिला. पण प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने गती मंदावली होती. ती जिल्हाधिकाऱ्यांनी वाढवली.

काय म्हणतात रहिवासीॽ : लेबर कॉलनीच्या जागेबाबत नवाबाची याचिकाही दाखल आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.

याबाबत योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहे. घर रिकामे करण्यासाठी कोर्टाने २० मार्च मुदत दिली असतानाही पथक आले. - रेणुका जगदीश निळेकर, रहिवासी

आम्हाला वाढीव मुदत मिळाली आहे. तरीही बुलडोझर आणणे हा कोर्टाचा अवमान आहे. आता या पथकावर कारवाई कोण करणार? - सय्यद अन्वर, रहिवासी

चार महिन्यांपूर्वी दिली नोटीस
घरे रिकामी करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २१ रोजी नोटीस दिली होती. ९ नोव्हेंबरपर्यंत त्यांना घरे रिकामे करण्याच्या सूचना होत्या. त्यावर रहिवासी न्यायालयात गेले. मात्र, त्यांची याचिका फेटाळून घरे रिकामी करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदत दिली. त्यापूर्वीच पाडापाडीचा प्रयत्न होत आहे.

फक्त सहा घरे रिकामी झाली
नोटिसीनंतर ३३८ पैकी सहा भाडेकरूंनी घरे रिकामी केली आहेत. यातील सहा घरांत कुणीच राहत नाही. येथे वन बीएचकेची २००, टू बीएचकेची ४०, थ्री बीएचकेची १० घरे आणि ८८ फ्लॅट आहेत.

अनेक वर्षांपासूनचे घर सोडून आम्ही कुठे जाणार? माझ्या घरात सगळे आजारी आहेत. २० मार्चनंतरही आम्ही जाणार नाही. - सय्यद पाशा करीम, रहिवासी

गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथक लेबर काॅलनीत बुलडोझरसह पोहोचले. मात्र, असे पथक येणार असल्याची बातमी आधीच फुटली होती. त्यामुळे काही मिनिटांतच ५०-६० महिला लहान मुलांसह आल्या. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला. काही जणींनी थेट बुलडोझरसमोर स्वत:ला झोकून दिले. एक महिला चक्कर येऊन कोसळल्यावर तणाव निर्माण झाला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. सिटी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या पुढाकारातील पथकात पोलिसांची संख्याही तुलनेने कमी होती. महिला, मुलांना कसे हटवावे, असा प्रश्न पथकापुढे उभा राहिला. अखेर एकाही इमारतीला धक्का न लावता पथक परतले.

बातम्या आणखी आहेत...