आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणवाडीत बॅनरवरून वाद:पोलिस रात्री कोम्बिंग ऑपरेशनमध्ये व्यग्र; अरुण बोर्डे-आमराव गटांत तुंबळ हाणामारी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाठ्या-काठ्यांनी मारहाणीत अनेक जण गंभीर जखमी

गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बुधवारी (६ एप्रिल) रात्री संपूर्ण पोलिस दल रस्त्यावर उतरून शहरातील विविध भागांत कोम्बिंग ऑपरेशन करत असताना दुसरीकडे कोकणवाडीतील मुख्य रस्त्यावर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. सुमारे शंभरहून अधिक तरुणांनी लाठ्या-काठ्या, लोखंडी सळईने यथेच्छ हाणामारी केली. यात नऊ जण रक्तबंबाळ झाले, त्यापैकी चौघांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एवढी गंभीर घटना होऊन २४ तास उलटले तरी गुरुवारी (७ एप्रिल) रात्रीपर्यंत या प्रकरणात कुणीही तक्रार दिली नाही की पोलिसांनी स्वत:हून कोणावरही गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॅनर लावण्यावरून हे वाद झाल्याचे सांगण्यात येते.

मंगळवारपासून शहरात ठिकठिकाणी बॅनर, झेंडे लावण्यास सुरुवात झाली. बुधवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास काही कार्यकर्ते कोकणवाडी, अहिल्याबाई होळकर चौक परिसरात शुभेच्छाचे बॅनर लावत होते. मात्र, यादरम्यान एमआयएमचे पदाधिकारी अरुण बोर्डे आणि दलित समाजाचे नेते राजू आमराव या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर लावण्यावरून वाद झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार वाद वाढत गेला व जवळपास ५० च्या वर तरुणांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्या, लोखंडी सळईने हल्ला चढवला. काही वेळातच आणखी समर्थक जमले व दोन्ही बाजूने दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात कुणीही पोलिसांत तक्रार दिली नाही म्हणून गुन्हा दाखल नव्हता. पोलिसांनी स्वत:हून ठोस कारवाई केली नाही. सहायक आयुक्त अशोक थोरात, निरीक्षक सचिन सानप यांना विचारणा करण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

जमावाला शांत करून पोलिस निघून गेले
घाटीतील नोंदीनुसार संदेश सखाराम बोर्डे (२०), तुषार अशोक बोर्डे (२८), अरुण विठ्ठल बोर्डे, सागर दादाराव आढाव, अनिकेत सखाराम बोर्डे (सर्व रा. क्रांतीनगर) या जखमींवर उपचार करण्यात आले. तर काही जखमींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. घटनेची माहिती मिळाल्याच्या बऱ्याच वेळानंतर वेदांतनगर पोलिस दाखल झाले. या हाणामारीत अनेकांच्या पायाला गंभीर इजा झाली तर अनेकांच्या चेहऱ्याचे मांस निघाले, कानदेखील फाटल्याचे पोलिसांना दिसले. मात्र, जमावाला शांत करण्यापलीकडे पोलिसांनी काहीच ठोस कारवाई केली नाही. या बोर्डे-आमराव गटांत यापूर्वीही वाद झाले होते मात्र त्या वेळीही ठोस कारवाई झाली नव्हती, त्यामुळे टोकाला वाद गेला.