आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:वेडसर तरुणाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 50 पेक्षा जास्त ठिकाणी साधला संपर्क; तरुण औरंगाबाद जिल्ह्यातील पोखरी येथील रहिवाशी

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.

औंढा नागनाथ-जिंतूर मार्गावर भोगाव पाटीजवळ आढळून आलेल्या वेडसर तरुणाच्या नातेवाईकांच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल 50 पेक्षा अधिक ठिकाणी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आहे. अखेर त्याच्या नातेवाईकांचा शोध लावून त्या तरुणास त्यांच्या हवाली केले. संतोष रामदास पाराशर (30 रा. पोखरी जिल्हा औरंगाबाद) असे या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली व परभणी येथे राज्यपालांचा दौरा असल्यामुळे औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, जमादार माणिक डुकरे, संदीप सुरूशे, इम्रान कादरी, गणेश लेकूळे, महेश अवचार, प्रविण चव्हाण यांचे पथक भोगाव पाटीजवळ बंदोबस्तासाठी गेले. शनिवारी ता. 7 त्या ठिकाणी एक वेडसर व्यक्ती रस्त्यावरून जात असल्याचे आढळून आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी त्या व्यक्तीची चौकशी केली. मात्र त्याला त्याचे नाव सांगता येत नव्हते. पोलिसांनी आठ तास त्याचा सांभाळ केला. त्यानंतर त्याची पुन्हा चौकशी सुरु केली.

दरम्यान, तो संतोष पाराशर असे सांगत मोबाईल क्रमांकाचे वेडेवाकडे आकडे पुटपुटत होता. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्या पथकाने मोबॉईलच्या आकड्यांची जुळवा जुळव करत किमान 50 पेक्षा अधिक ठिकाणी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यामध्ये एका महिलेशी पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना व्हाट्सअप वर त्या तरुणाचा फोटोही पाठवण्यात आला.

त्यावरून त्यांनी संतोष रामदास पराशर असे त्याचे नाव असून तो वेडसर आहे. तसेच 7 दिवसापूर्वी तो घरातून निघून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यातच थांबून ठेवले. त्यानंतर आज त्याचा भाऊ पोलीस आल्यानंतर दोघांनाही भोजन, कपडे तसेच तिकिटाचे पैसे देऊन त्यांना गावाकडे पाठवले. पोलिसांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...