आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:खुनी गुंडासोबत पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीचे रात्री भररस्त्यावर नशेत बेधुंद नृत्य; जेलमधून सुटताच आरोपीने साजरा केला मैत्रिणीचा बर्थडे

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोघांच्या हाती बिअरची बाटली, सिगारेट, कर्णकर्कश आवाजात गाणी अन‌् कारवर डान्स
  • तरुणीने यापूर्वी क्रांती चौक पोलिस ठाण्यातही नशेत घातला होता गोंधळ

खून, अपहरण, घरजप्तीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड शेख जावेद शेख मकसूद ऊर्फ टिप्या (३२, रा. विशालनगर) एक वर्षाची शिक्षा भाेगून हर्सूल कारागृहातून बाहेर आला. त्याच दिवशी मैत्रिणीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्याच्या नावाखाली त्याने तिच्यासाेबत मध्यरात्री पुंडलिकनगरच्या रस्त्यावर हाती बिअरची बाटली, सिगारेट घेऊन व कर्णकर्कश आवाजात गाणे लावून कारच्या बाेनेटवर चढून अगदी सिनेस्टाइल धांगडधिंगा केला. ४ ऑक्टोबर रोजीच्या घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ टिप्यासह साथीदार मनोज बळीराम जाधव (३६) याला अटक केली. विशेष म्हणजे टिप्याची ही मैत्रीण दुसऱ्या जिल्ह्यातील पाेलिस अधिकाऱ्याची मुलगी आहे.

टिप्यावर आतापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, खंडणी, विनयभंग असे २० हून अधिक गंभीर गुन्हे आहेत. त्याची पुंडलिकनगर, गारखेडा भागात दहशत आहे. ४ ऑक्टोबर रोजी त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस हाेता. ताे साजरा करण्यासाठी टिप्या गँगने भररस्त्यावर पार्टी आयोजित केली. कारचे चारही दरवाजे उघडे करून मोठ्या आवाजात गाणे लावले. दारूच्या नशेत तर्र असलेली तरुणी कारवर चढली. तिच्यापाठोपाठ टिप्या कारवर चढला व बेतालपणे हातात दारूच्या बाटल्या, सिगारेट ओढत दाेघेही कारच्या बाेनेटवर नाचत होते. दहशतीमुळे त्यांना राेखण्याची हिंमत कुणी केली नाही. मात्र मागील दोन दिवसांमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला. मग पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तत्काळ टिप्या, मनोजला अटक केली. तसेच मैत्रिणीसह पाच जणावर गुन्हा दाखल केला. पाेलिस टिप्याला अटक करायला गेले तेव्हा त्याच्या कमरेला तलवार व चाकू हाेता. ताे कायम पिस्टल बाळगताे. अटकेनंतर त्याला पाेलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्तांसमाेर हजर केले.

तरुणीने यापूर्वी क्रांती चाैक पाेलिस ठाण्यातही नशेत घातला हाेता गाेंधळ

टिप्यासारखा कुख्यात गुंडासाेबत नाचणारी मुलगी एका पोलिस अधिकाऱ्याची सुशिक्षित मुलगी असल्याचे समाेर आले. दहा दिवसांपूर्वी तिनेच क्रांती चौकात मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला होता. पोलिसांनी तिला ताब्यातही घेतले. दारूची झिंग उतरल्यावर पोलिस अधिकाऱ्याची मुलगी असल्याचे समजल्यावर तिला समज देऊन सोडून देण्यात आले. टिप्याने चौकशीत सांगितल्यानुसार, त्याच्या मित्रांच्या माध्यमातून त्याची व तिची ओळख झाली. बाहेरगावी असलेल्या आई-वडिलांसोबत पटत नसल्याने ती आैरंगाबादेत राहत असल्याचे समोर आले आहे.

टिप्यावर चार जणांच्या खुनाचा आराेप

टिप्यावर चार जणांच्या खुनाचे आराेप आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये दुचाकीला साइड न दिल्याच्या किरकाेळ कारणावरून त्याने चाकूने भाेसकून एक खून केला. सप्टेंबर २०१९ मध्ये सततच्या गंभीर गुन्ह्यांमुळे एमपीडीएअंतर्गत हर्सूल कारागृहात त्याला एका वर्षासाठी स्थानबद्ध केले. सप्टेंबर २०२० मध्ये तो कारागृहातून बाहेर आला. काही दिवसांपूर्वी एका दुकानातून फुकट मोबाइल घेऊन गेला. परिसरातील अनेक बारमध्ये ताे पैसे न देता सर्रास दारू ढाेसताे, पार्ट्या करताे. तरीही त्याच्याविरोधात कुणीही तक्रार द्यायला पुढे येत नाही. काही स्थानिक बड्या व्यापारी, बारचालकांनी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनीच आता टिप्यासंदर्भात कठोर कारवाई करून कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

हातावर ‘मौत’ गोंदवले, गाडीचा नंबर ३०२

टिप्या स्वत:ला ‘औरंगाबादचा किंग’ म्हणवतो. काेर्ट सुनावणीला आल्यानंतर पुन्हा तुरुंगात जाताना, पोलिसांच्या गाडीतून उतरताना त्याचे साथीदार उपस्थित असतात. त्याचे व्हिडिओ तयार करतात. सोशल माध्यमावर स्वत:ला ‘मौत टिप्या’, ‘मौत का सौदागर’ असे म्हणवून घेणारे त्याचे पेज आहे. टिप्याने हातावरदेखील ‘मौत’ गोंदवून घेतले आहे. त्याने मोबाइल क्रमांकाच्या शेवटचे आकडे ‘३०२’ हे खुनाचे कलम असलेले घेतलेले आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या गाडीचा क्रमांकदेखील ३०२ असून गाडीवर समोरही ‘माैत’ लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...